Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत भाजपची मोठी खेळी; काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेले पाच जण झाले थेट आमदार; निष्ठावंतांच्या पदरी मात्र पुन्हा उपेक्षा

Maharashtra MLC Elections News : भाजपने इतर पक्षातून आलेल्या नेत्यासाठी पायघड्या घातल्याचे पुढे आले आहे तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीसाठी इच्छुक असेलल्या भाजप निष्ठावंतांच्या पदरी मात्र पुन्हा उपेक्षाच आल्याचे पाहावयास मिळत आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. 17 पैकी 16 जागेवर महायुतीने बाजी मारली तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. महायुतीमधील भाजपचे 11, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे भाजपने काँग्रेसमधून आलेल्या 11 पैकी पाच जणांना थेट विधान परिषेदचा आमदार केले आहे. त्यामुळे भाजपने इतर पक्षातून आलेल्या नेत्यासाठी पायघड्या घातल्याचे पुढे आले आहे तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीसाठी इच्छुक असेलल्या भाजप निष्ठावंतांच्या पदरी मात्र पुन्हा उपेक्षाच आल्याचे पाहावयास मिळत आहे.

राज्यातील गेल्या दोन वर्षापेक्षा अधिककाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य सदस्यातून निवडून द्यावयाच्या विधानपरिषद निवडणुकीला मुहूर्त लागल्याने व सर्वच मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व दिसत असल्याने भाजपकडून पक्षातील निष्ठावंत नेत्याला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे भाजपकडून सर्वच मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, ऐनवेळी भाजपने रणनीती बदलत जवळपास ११ पैकी पाच जागांवर इतर पक्षातून आलेल्या नेत्याला संधी देत थेट आमदार म्हणून निवडून आणले आहे.

मराठवाड्यातील धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघातून भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपचे नेते दत्ता देशमुख, संभाजी पाटील-निलंगेकर या निष्ठावंत नेत्याला डावलून काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटील यांना संधी दिली. या मतदारसंघातून मोठ्या फरकाने भाजपचे बसवराज पाटील विजयी झाले आहेत.

विधानपरिषदेच्या नांदेड मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अमर राजूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली. राजूरकर यांनी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. राजूरकर यांच्यामुळे भाजपकडून असलेल्या इच्छुक असलेल्या काही नेत्यांना मात्र संधी मिळाली नाही.

विदर्भातील भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर हे देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारली आहे. ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिल्याने भाजपकडून इच्छुक असलेल्या अनेकांचा भ्रमनिरास झाला होता.

सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेल्या धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली होती. याठिकाणी भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू देखील इच्छुक होते. मात्र, त्यांच्याऐवजी धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. कदम हे विजयी झाले आहेत. तर अहिल्यानगर मतदारसंघात विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इतरांना वगळून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. तनपुरे या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाले होते.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देत गेल्या अनेक दिवसापासून भाजपचे काम निष्ठेने करणाऱ्या नेत्याची अडचण केली आहे. भाजपमधील निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात न आल्याने त्यांच्या पदरी पुन्हा एकदा उपेक्षाच पहावयास मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT