

Mumbai News : राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांवर कोण लढणार हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट झाले आहे. महायुतीमधील भाजपला 11, शिवसेनेला 4, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या आहेत.
तर महाविकास आघाडीने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होऊ न देता सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार काँग्रेस 8 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे.
त्यामुळे आता जवळपास सर्व जागेवर एकमेकांच्या विरोधात कोण लढणार हे फायनल झाले आहे. या 17 मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता याठिकाणी महायुतीचे एकत्रित संख्याबळ विजय मिळवून देण्या इतपत आहे. तर काही ठिकाणी बंडखोरी अथवा क्रॉस व्होटिंग झाले तरच महायुतीचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कोणत्या ठिकाणी कोण आमने सामने?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष
पुणे विधानपरिषद मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे रिंगणात आहेत तर त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील निवडणूक लढत आहेत. त्यातच माजी आमदार सुनील टिंगरे यांनी देखील याठिकाणी फॉर्म भरला आहे. त्यामुळे त्यांची समजूत कशाप्रकारे काढली जाणार यावर बरेच गणित अवलंबून आहे.
सोलापूर : काँग्रेस विरुद्ध भाजप :
सोलापूर विधानपरिषदेसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. भाजपने याठिकाणी माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून या ठिकाणी काँग्रेसचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये याठिकाणी सरळ लढत होणार आहे.
सांगली-सातारा : भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) :
सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशी थेट लढत होत आहे. याठिकाणी भाजपने याठिकाणी धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सातारा जिल्ह्यातील दोन माजी मंत्री शशिकांत शिंदे व बाळासाहेब पाटील इच्छुक असताना पक्षाने सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक बाळासाहेब पाटील आणि डमी उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
अहिल्यानगर - काँग्रेस विरुद्ध भाजप :
अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. याठिकाणी महायुतीमधील भाजपकडून दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी राहुरी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला मदत केली होती. त्या बदल्यात ही उमेदवारी बक्षिसी म्हणून दिली आहे. तर याठिकाणी महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र काँग्रेसचे श्रीरामपूर नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे याठिकाणी येत्या काळात घोडेबाजराला ऊत येणार आहे.
ठाणे : शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) :
ठाणे विधानपरिषद मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लढत होणार आहे. याठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा एकदा माजी आमदार रवींद्र फाटक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभिजीत पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी दोन पक्षात सरळ लढत होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना- ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप :
छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडून त्यांच्या विरोधात भाजपचे अतुल शिरसाट मैदानात उतरले आहेत. याठिकाणी शिवसेनेच्या समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
धाराशिव-लातूर-बीड : काँग्रेस विरुद्ध भाजप
धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे. भाजपने याठिकाणी काँग्रेसमधून आलेल्या माजी मंत्री बसवराज पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे तर त्यांच्या विरोधात याठिकाणी काँग्रेसचे महेश देशमुख यांना आखाड्यात उतरवले आहे. याठिकाणी दोन्ही उमेदवार हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील असल्याने त्यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.यावेळेस येथील आमदार हा धाराशिव जिल्ह्यातील असणार आहे.
परभणी-हिंगोली : शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना
मराठवाड्यातील परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ संख्याबळानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. विवेक नावंदर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याठिकाणी नावंदर यांची लढत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार सईद खान यांच्यासोबत होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेड : शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप :
नांदेड विधान परिषद मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी सरळ लढत हॊत असून याठिकाणी भाजपने काँग्रेमधून आलेल्या माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर निवडणूक लढत आहेत. याठिकाणी महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे.
नाशिक : शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना
नाशिकमध्ये शिवसेनेकडून नरेंद्र दराडे हे रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली होती. त्यांनी निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती.
मात्र, आता या निवडणुकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण शेवटच्या दिवसापर्यंत अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. महाविकास आघाडीकडून कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
अमरावती : काँग्रेस विरुद्ध भाजप
अमरावती मतदारसंघातून महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाचे हर्षजित देशमुख उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात महायतीकडून प्रवीण पोटे पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत आहे.
नागपूर (पोटनिवडणूक) : काँग्रेस विरुद्ध भाजप
नागपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाचे अतुल लोंढे हे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे राजीव पोतदार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत आहे.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : काँग्रेस विरुद्ध भाजप
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाचे शैलेश अगरवाल उमेदवार असणार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपचे अरुण लखाणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी दुरंगी लढत होणार आहे.
जळगाव : शिवसेना उबाठा विरुद्ध भाजप
महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे हे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपाचे नंदकिशोर महाजन हे रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी महायुतीचे वर्चस्व आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेना उबाठा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस
महाविकास आघाडीतून शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात महायतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या जुईली दळवी यांनी बंडखोरी केली आहे.
यवतमाळ : काँग्रेस विरुद्ध शिवसेना
महाविकास आघाडीतून काँग्रेसचे साहेबराव कांबळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेने दुष्यंत चतुर्वेदी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या दोंघांमध्ये सरळ लढत होत आहे.
भंडारा-गोंदिया : काँग्रेस विरुद्ध भाजप
भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसने दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांना आखाड्यात उतरवले आहे.
या १७ जागांवर यापूर्वी कोण होते आमदार?
सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.