Chandrapur News : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या हाता तोंडाशी आलेले महापौरपद शिवसेनेने ऐनवेळी भाजपसॊबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हिरावले गेले. त्या सर्व घटना घडामोडीच्या रसभरीत चर्चा पुढे येत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे तर दुसरीकडे नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता काँग्रेससोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर भाजप व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत युतीची बोलणी कुठे व कशी झाली याची इनसाईड स्टोरीच समोर आली आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने (Congress) लातूर आणि चंद्रपूर ह्या दोन महापालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचा महापौर होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटांमुळे पक्षाची चांगलीच वाताहात झाली. अखेर दिल्लीश्वरांच्या मध्यस्थीने सत्तास्थापनेचा मुहूर्त लागला. तरीही, ऐनवेळी ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसचा सगळा खेळ बिघडवला. त्यामुळे, चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असतानाही काँग्रेसला मॅजिक फिगर गाठता आला नाही.
भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची (Shivsena) मंगळवारी चंद्रपूर महापालिकेत युती झाली. शिवसेनेची शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत बोलणी सुरू होती. मात्र, अचानक बोलनी फिस्कटल्याने शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे हे वडेट्टीवार यांच्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांना संपर्क केला. मात्र, भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा आणि करारनामा करण्यासाठी अतिशय कमी वेळ होता. त्यामुळे कारमध्येच युतीची अंतिम चर्चा करण्यात आली आणि त्याच कारमध्ये कशाप्रकारे सत्तेचे समीकरण बसवण्यात येईल याचा करारनामा देखील करण्यात आला.
या दोन नेत्यांमधील चर्चेनंतर कारमध्येच भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आणि शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी सही देखील केली. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी मंगळवारी घडलेल्या अत्यंत वेगवान आणि नाट्यपूर्ण घडामोडींमध्ये कारमधील करारनाम्याची ही ईनस्टाईड स्टोरी समोर आली आहे.
चंद्रपूरच्या महापौर निवडणुकीत किंगमेकर व्हावे म्हणून माझी भूमीका महत्वाची नाही, तर चंद्रपूरच्या जनतेच्या विजय व्हावा, यासाठी मी काम करत होतो. जे सर्व काँग्रेस विरोधात होते त्या सर्वांना आम्ही एकत्र केले. सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बोलणं सुरु होते. काँग्रेसचे पण काही नगरसेवक आमच्या संपर्कात होते, आमच्यामुळे त्यांचं नगरसेवकपद अडचणीत येईल याची खबरदारी घेत होतो. मात्र अटीतटीच्या परिस्थितीत ते काँग्रेस नगरसेवक आम्हाला मदत करायला तयार होते, असा गौप्यस्पोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची चर्चा सतत सुरु होती. मात्र, अंतिम निर्णय शेवटच्या तासात ठरले. एक वर्षाऐवजी उबाठाला सव्वा वर्षांसाठी महापौर द्या, मात्र पहिला महापौर भाजपचाच झाला पाहिजे ही भूमिका देवेंद्र फडणवीसांची होती, अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.