

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना-भाजप युतीने मोठी मुसंडी मारत खेर्डी आणि वहाळ गटात विजय मिळवला.
सावर्डे गटातून पूजा निकम यांनी धनश्री शिंदे यांचा ५,६१९ मताधिक्याने पराभव केला, जो तालुक्यात सर्वाधिक ठरला.
या निकालामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येते.
Ratnagiri News : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेना-भाजप युतीने मुसंडी मारली. परिणामी, खेर्डी आणि वहाळ गटात राष्ट्रवादीचे सभापतिपदाचे दावेदार असलेले उमेदवार गारद झाले. या दोन्ही गटांत झालेला पराभव राष्ट्रवादीसाठी धक्कादायक ठरला आहे. सावर्डे गटातून आमदार शेखर निकम यांच्या पत्नी व माजी सभापती पूजा निकम यांनी शिंदे सेनेच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांचा तब्बल ५ हजार ६१९ विक्रमी मताधिक्याने पराभव केला. निकम यांचे हे मताधिक्य तालुक्यात सर्वाधिक राहिले आहे.
चिपळुणात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीलाच स्वबळाचा नारा देत एकहाती किल्ला लढवला; मात्र त्यांना मोठा पल्ला गाठता आला नाही. पालिका निवडणुकीत अपयश आल्यानंतर आमदार शेखर निकम व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जोमाने लढण्याची तयारी केली होती. आमदार निकम यांनीही प्रत्येक गण आणि गटात बारकाईने लक्ष देत मतांची गोळाबेरीज करण्यावर भर दिला होता.
कार्यकर्त्यांना उणीव भासणार नाही, याची खबरदारी घेतली होती. खेर्डी जिल्हा परिषद गटावर नेहमीच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे; मात्र या वेळी या गटात भाजपने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली. जिल्हा परिषद गटातून भाजप रावी मोरे विजयी झाल्या, तर जिल्हा बँकेच्या संचालिका आणि दुसऱ्यांदा या निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या दिशा दाभोळकर यांना पराभव स्वीकारावा लागला.
तसेच खेर्डी पंचायत समिती गणात तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, भाजपकडून तालुकाध्यक्ष विनोद भुरण, तर ‘उबाठा’कडून युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते रिंगणात होते. एक गाव आणि एकच गण असलेल्या या गणातून भाजपने राष्ट्रवादीला धक्का देत बाजी मारली. तालुकाध्यक्ष विनोद भुरण विजयी झाले. खेर्डीत दथरथ दाभोळकर आणि जयंद्रथ खताते यांची एकी झाली, तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
वहाळ जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. या गणातून राष्ट्रवादीचे माजी सभापती सुरेश खापले यांना नवख्या संजय जावळे या उमेदवाराने पराभूत केले. पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आली असती, तर सुरेश खापले आणि नितीन ठसाळे हे सभापतिपदाचे दावेदार मानले जात होते; मात्र हे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने आमदार निकमांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. वहाळ गटात शिवसेनेचे संदीप सावंत हे किमयागार ठरले. या गटातून त्यांची पत्नी शिवानी सावंत जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत.
शिगवण, खापरे सलग दुसऱ्यांदा जिंकले
निवळी गणातून ‘उबाठा’च्या संजीवनी खापरे यांनी दुसऱ्यांदा पंचायत समितीवर बाजी मारली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद शिगवण व ‘उबाठा’च्या खापरे हे दोनच उमेदवार सलग दुसऱ्यांदा पंचायत समितीवर निवडून गेले आहेत.
1. कोणत्या गटात राष्ट्रवादीला धक्का बसला?
खेर्डी आणि वहाळ गटात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला.
2. पूजा निकम यांनी किती मताधिक्याने विजय मिळवला?
त्यांनी ५ हजार ६१९ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला.
3. हा निकाल कोणासाठी महत्त्वाचा ठरला?
शिवसेना-भाजप युतीसाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला.
4. तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य कुणाला मिळाले?
पूजा निकम यांना तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले.
5. या निकालाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
सत्तेची समीकरणे बदलण्याची आणि युतींचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.