

Chandrapur Mayor Election : चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्याने भाजपच्या उमेदवार संगीता खांडेकर यांनी विजय मिळवला. मतदानात खांडेकर यांना ३२ मते मिळाली, तर महाडूळे यांना 31 मतं पडली.
चंद्रपूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप युतीची सध्या सबंध महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. पण पहाटेपर्यंत काँग्रेससोबत चर्चा सुरु असताना अचानक समीकरण कशी बदलली? कोणाच्या सांगण्यावरून ही युती झाली? या युतीला उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद आहे का? याबाबतची सविस्तर माहिती उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, चंद्रपूर महापालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा संपूर्णपणे स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाने सर्वाधिकार स्थानिक नेत्यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक नेत्यांनी पूर्णपणे निर्णय घेतले आहेत.
स्थानिक नेत्यांनी पूर्ण ताकद लावून निवडणुका देखील लढल्या. त्यामुळे निवडणुकीनंतर देखील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे त्याच नेत्यांना देण्यात आले आहे. हा निर्णय फक्त चंद्रपूरपुरता नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पक्षाने घेतला आहे. चंद्रपूर येथील निवडणूक जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात लढल्या होत्या. निवडणूक निकालानंतर गिऱ्हे आणि त्यांच्या टीमने काँग्रेससोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसने कोणताही निर्णय वेळेत घेतला नाही. काँग्रेसमध्ये गोंधळ सुरूच होता. त्यामुळे स्थानिक पातळीवरती पक्षामध्ये विस्कळीतपणा येऊ नये म्हणून संदीप गिऱ्हे यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत माझ्याशी चर्चा केली होती. त्यानंतर चंद्रपूरमध्ये जी स्थानिक समीकरणं आणि परिस्थिती आहे ती मी पक्षप्रमुखांना कळविलेली आहे. त्यामुळे संदीप गिऱ्हे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही विसंवाद नाही, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.