Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू अवस्था आहे. एकूण 66 नगरसेवक असलेल्या चंद्रपूर महापालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 34 नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत तर भाजपकडे 23 नगरसेवक आहेत. भाजप आणि काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सहा नगरसेवकांची गरज भासणार आहे. शिवसेनेसोबत वंचित आघाडीचे दोन तर अपक्ष दोन नगरसेवक असे 10 नगरसेवक एकत्र आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या चंद्रपुरातील सत्तास्थापनेबाबत मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमधील दोन गटातील वाद दिल्लीदरबारी पोहचला होता. तर चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत आता ट्विस्ट पाहावयास मिळत आहे. किंगमेकर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवाराने महापौर पदासाठी उमेदवार रिंगणात उतरवला असल्याने प्रस्थापितांची झोप उडाली आहे.
चंद्रपूर महापालिकेत महापौर पदावरून जोरदार चुरस पाहावयास मिळते. एकीकडे काँग्रेस व भाजपने (BJP) महापौर आमचाच होणार असा दावा केला असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार धानोरकर यांचे दोन गट आहेत. त्यांचा हा वाद दिल्लीदरबारी पोहचला होता.
त्याठिकाणी वाद मिटवल्यानंतर आता धानोरकर यांचा महापौर तर वडेट्टीवार यांचा उपमहापौर होणार आहे. दुसरीकडे भाजपमध्येही दोन गट आहेत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांच्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे आता येत्या काळात महापौर कोणाचा होणार यावरून उत्सुकता लागली आहे. त्यातच आता चंद्रपूर महापौर पदाच्या आखाड्यात उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने 'एन्ट्री' केली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेस आणि भाजपशी एकीकडे चर्चा सुरू असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही (Shivsena) महापौरपदासाठीचा अर्ज भरला आहे. निकाल लागल्या दिवसापासून ठाकरेंच्या शिवसेनेने आपलाच महापौर हवा, अशी आघाडी करताना अट घातली होती.
त्यासाठी काँग्रेस आणि गरज वाटल्यास भाजपसोबतही जाण्याचा पवित्रा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी घेतला होता. मात्र आता किंगमेकर असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पत्नी मनस्वी गिऱ्हे यांनी गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापालिका मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात दाखल होऊन शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 तर वंचितचे 2 आणि काँग्रेस बंडखोर असलेले दोन अपक्ष असा 10 जणांचा गट असून यातील एक असलेल्या प्रशांत दानवे या काँग्रेस बंडखोर अपक्ष नगरसेवकाचा उपमहापौरपदासाठी अर्ज भरला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता महापौर पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट दिसणार आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जो आम्हाला महापौर पद देईल त्याच्यासोबत आम्ही जाऊ, ही भूमिका आमची अगदी पहिल्या दिवसापासूनची स्पष्ट भूमिका होती. हा सर्व आकड्यांचा खेळ आहे आणि जो कोणी आम्हाला सोडून सत्तेत जाण्याचे स्वप्न बघत असेल त्याला आमच्या शुभेच्छा असल्याचे गिर्हे म्हणाले.
भाजपसोबत अजून तरी सव्वा सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्यावर आमची अधिकृत चर्चा झालेली नाही. काँग्रेसच्या नेत्यांसोबत काल देखील चर्चा झाली, त्यांनी आम्हाला महाविकास आघाडी म्हणून सोबत राहू, असं सांगितलं. पण त्यांनी आम्हाला महापौर पद जाहीर करावं, आम्ही त्यांच्या सोबत राहू अशी आमची भूमिका आहे. येत्या दहा तारखेला तुम्हाला निकाल स्पष्ट दिसेल, असेही गिर्हे यावेळी म्हणाले.
जनविकास सेनेचे नगरसेवकाचा उपमहापौर पदासाठी अर्ज
उपमहापौर पदाचा अर्ज करण्यासाठी जनविकास सेनेचे नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख सायकलने महानगरपालिकेत दाखल झाले होते. पप्पू देशमुख यांच्या जनविकास सेनेचे चंद्रपूर महानगरपालिकेत आहेत 3 नगरसेवक आहेत.
तर काँग्रेससोबत निवडणूक पूर्व आघाडी करणाऱ्या जनविकास सेनेला उपमहापौर पदाची अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने उपमहापौर पदासाठी वसंता देशमुख यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे आता पप्पू देशमुख यांना उपमहापौर पद मिळणार का याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.