Chhagan Bhujbal sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : "माझा मराठा आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा, पण...", भुजबळ विधानसभेत संतापले

Akshay Sabale

Maratha Reservation Maharashtra Assembly Special Session : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं आज मंगळवारी ( 20 फेब्रुवारी ) विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आरक्षणाबाबतचे विधेयक मांडत मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर हे विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर झालं. या वेळी मंत्री छगन भुजबळ संतापल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं. "मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जसा घेतला, तसं इतर मुद्द्यावर घेईल. आरक्षणाच्या मुद्द्याला एकमतानं मान्यता देऊन विधेयक मंजूर करावे. घेतलेला निर्णय अत्यंत धाडसी, ऐतिहासिक आणि टिकणारा आहे," असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर मराठा आरक्षणाचे विधेयक एकमतानं सभागृहात मंजूर झाले. तेव्हा छगन भुजबळ आणि विरोधकांनी गोंधळ घातला. या वेळी छगन भुजबळांनी संतापत म्हटलं, "माझा मराठा आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा आहे. पण, मला बोलूच दिले जात नाही."

नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव सादर केला. शोकप्रस्ताव झाल्यावर छगन भुजबळांना बोलण्याची संधी विधानसभा अध्यक्षांनी दिली. या वेळी भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

छगन भुजबळ म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षणाला माझा विरोध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी आम्ही सतत केली, पण मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांचा उल्लेख केला. जरांगे सतत धमक्या देतात. याला टपकवील... त्याला टपकवील.... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून शिव्या देतात. ही दादागिरी थांबवणार आहात की नाही?"

"27 जानेवारीला गुलाल उधळल्यानंतर 10 फेब्रुवारीला परत जरांगे उपोषणाला बसले आहेत. अनेक शहरात बसगाड्या फोडल्या. राज्यात भीतीचं वातावरण जरांगे पाटील निर्माण करत आहेत. हे थांबायला हवं. मराठा समाजाला वेगळं आरक्षणाचा ठराव केला, तरी यांचं आंदोलन चालूच राहणार आहे. जरांगेंना काही बोललं की ते आम्हाला धमकी देतात. आता हे आरक्षण नको ओबीसीतून आरक्षणाची मागणी जरांगे करत आहेत," अशी टीका भुजबळांनी केली आहे.

भुजबळांनी धमकीबाबत केलेल्या विधानाची अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंद घेतली. "भुजबळांना कुठल्याही प्रकारे जीवहानीची संभावना वाटत असेल, तर त्याची चिंता व्यक्त करणं रास्त आहे. शासनाने याची नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी," असे निर्देश नार्वेकरांनी दिले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT