Manoj Jarange Patil Dhananjay Munde sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange On Dhananjay Munde : धनंजय मुंडे स्वतःच पाप झाकायसाठी ओबीसीचं पांघरूण घेतो, २५ नंतर तुला बघतोच!

Communalism is not in my blood, Manoj Jarange Patil : पंचवीस दिवसानंतर मी तुमचे नाव घेतले. पण पीक विमा, राख, गवऱ्या, डोंगर, दगड गोटे,संडास खाता की काय? या टोळक्याने जातीची आब घातली, तरी धनंजय मुंडे या लाभार्थी टोळ्यांची बाजू घेतो, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे

Jagdish Pansare

पैठण : सरपंच संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्यांची धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बाजू घेतो. पंचवीस दिवस मी तुझं नाव घेतलं नाही. पण ज्या दिवशी तुझ्या गुंड, लाभार्थी टोळ्यांनी धनंजय देशमुखला धमकावलं, तेव्हा पासून तू माझ्या डोक्यात बसलायं. जातीयवाद हा माझ्या रक्तात नाही, गुंडांविरोधात बोलायचं नाही का? मुडदे पाडणाऱ्यांच्या बाजूने तू उभा राहतो? उद्या प्रत्येक जातीत असे व्हायला लागेल, धनंजय मुंडे तू कोणत्या दिशेने महाराष्ट्र घेऊन चाललायं, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना सुनावले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजपचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात मराठवाड्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. धनंजय मुंडे समर्थक जरांगे पाटील हे जाती-जातीत तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला जातोय.

यावर जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून संताप व्यक्त करत धनंजय मुंडे स्वतःचे पाप झाकायसाठी ओबीसीचा आधार आणि पांघरून घेत असल्याचा आरोप केला. सरंपच संतोष देशमुख यांच्या खूनानंतर त्यांच्या लेकीने आम्हाला हाक दिली, तिच्या हाकेला धावून जायचे नाही का? देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मागे हटायचं नाही, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबाला दिलेला शब्द पाळला पाहिजे या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, अन्यथा गाठ आमच्याशी आहे. जीवात जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही देतानाच जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला. धनंजय मुंडेने जे प्रयोग, षडयंत्र सुरू केले आहे, मोर्चे, निदर्शने काढायला लावतोय. पण धनंजय मुंडे तू अजून खोलात जात आहेस. हा महाराष्ट्र तुम्ही कुठे घेऊन चालला आहात. लाभार्थी टोळीला आंदोलन करायला लावता आणि आरोपीची बाजू घेता.

यापुढे सगळ्या जाती अशाप्रकारे वागायला लागतील. मी परभणीला काय बोललो, धनंजय देशमुखांना मुंडेच्या लोकांनी धमकी दिली. गुंडाला बोलायचं नाही का? काय चुक केली. वंजारी, धनगर, ओबीसी, दलित मुस्लिमाला धमकी दिली का? धनंजय मुंडे ते आमच्या रक्तात नाही. तुझं पाप झाकण्यासाठी ओबोसीचा आसरा घ्यायला लागला. खून करणार तुम्ही, पापी तुम्ही, याच्यात ओबीसीला ओढणार का? असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला.

गुंडाला सोडणार नाही, माझ्यावर कितीही केसेस केल्या, एक हजार केसेस झाल्या तरी मागे फिरणार नाही. षंढाच्या, गुंडाच्या टोळ्या उभ्या केल्या तरी मागे हटणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. धनंजय मुंडे कर तूला किती केसेस करायच्या? आता तू मला खेटला, आता तूला बघतो. तुझे बरेच मॅटर आहे, परळी पासून मुंबईपर्यंत. माझे 25 चे आंदोलन होऊ दे, तुला मनोज जरांगे काय आहे दाखवतो. तु कोणत्या झाडाचा पाला आहेस, धमकी देणाऱ्या गुंडाबद्दल मी बोललो, जातीचा काय संबंध? असा सवाल जरांगे यांनी केला.

मुंडेच्या लाभर्थी टोळक्यांनी आब घातली..

आता तुझा भूकाटच वाजवतो, याच नाव मी कधी घेतलं नाही. मला तुझ्याशी घेणदेणं नाही. तू कोण लागून गेला, मी किती किलोचा आहे, ते त्यांना विचार असे म्हणत, त्यांनी प्रा. हाकेंना टोला लगावला. आम्ही तुमच्या जातीचा सन्मान करतो, पंचवीस दिवसानंतर मी तुमचे नाव घेतले. पण पीक विमा, राख, गवऱ्या, डोंगर, दगड गोटे,संडास खाता की काय? या टोळक्याने जातीची आब घातली, तरी धनंजय मुंडे या लाभार्थी टोळ्यांची बाजू घेतो.

धनंजय मुंडे मी भीत नसतो, ते बंद कर. पंचवीस नंतर भेटू, आता वेगळ्या पद्धतीने भेटू, त्यांना खर पचत नाही. आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो, त्यानंतर कायदेशीर भेटू, अशा इशारा देतानाच शेवटी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत उभे राहा, सुर्यवंशीच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी उपस्थितांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT