Shirdi News : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली. त्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार दहा ते 12 दिवस रखडला होता. त्यानंतर 15 डिसेंबरला नागपूरमध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर 21 डिसेंबरला खातेवाटप करण्यात आले. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना होण्याआधी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. मात्र, यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यावर आता शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केज तालुक्यातील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. यावरून विरोधकांकडून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर मोठे आरोप करण्यात आल्याने त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच झाल्याने वाटप रखडले होते. तर दुसरीकडे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता होती. त्यातच धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचे पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शनिवारी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव नव्हते. दुसरीकडे बीडचं पालकमंत्रिपद अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे देण्यात आले होते.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद का देण्यात आले नाही, त्यामुळे चर्चेला उधाण आले असतानाच यावर आता शिर्डी येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये प्रदीर्घकाळ पालकमंत्री म्हणून काम केले आहे. कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यायचे? याचा निर्णय महायुतीच्या तीन पक्षातील प्रमुख नेत्यांनी एकत्रित बसून घेतला असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
विशेष म्हणजे बीडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवण्यात आले आहे. हे पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहे. अजितदादा पुण्यासोबतच बीडचे नवे पालकमंत्री असणार आहेत. तर पंकजा मुंडे यांना जालन्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच मुंडे बहीण-भाऊ व्यतिरिक्त इतरांकडे बीडचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.
दरम्यान, या विषयी बोलताना धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे की, बीडची सध्याची स्थिती पाहून मीच दादांना विनंती केली, बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला, तसाच आता येत्या काळात बीडचाही व्हावा. ही माझी भावना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.