
Mumbai News, 19 Jan : महायुती सरकारमधील मंत्र्यांचे शपथविधी आणि त्यानंतर खातेवाटप झाल्यापासून पालकमंत्रिपदाची यादी कधी जाहीर होणार याकडे नेत्यांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. तर खातेवाटपाप्रमाणे पालकमंत्रिपदावरूनही महायुतीत (Mahayuti) मतभेद असल्यामुळेच याबाबतचा तिढा सुटत नसल्याची टीका विरोधकांकडून सरकारवर केली जात होती.
अशातच अखेर प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर असतानाच पालकमंत्रिपदाची यादी सरकारने शनिवारी (ता.18) जाहीर केली. मात्र, या पालकमंत्रिपदाच्या यादीत बीडचं (Beed) पालकमंत्रिपद कोणाकडे असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बीड जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असतानाच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चांगलेच अडचणीत आले आहेत. याच मुद्द्यावरून त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून केली जात आहे. मात्र, अद्याप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
शिवाय आता ते बीडच्या पालकमंत्रिपदी मुंडेंची वर्णी लावणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर बीडचं पालकत्व अजितदादांनी आपल्याकडे घेत मुंडेंना डावललं आहे. यावरूनच आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अजितदादांना, बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न राबवा, अशी विनंती केली आहे.
साम टीव्हीशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "साधारण तीन ते चार दशकांपासून काही अपवाद वगळता बीडच पालकमंत्रिपद हे कायम मुंडे घराण्याकडे राहिलेलं आहे. परंतु यावेळी हे पालकमंत्रिपद मुंडेंचे पारंपारिक विरोधक असणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हा कुठला देवी संकेत म्हणावा? असं म्हणत त्यांनी मुंडेंना डिवचलं.
मात्र, यावेळी त्यांनी अजितदादांचं अभिनंदन केलं. त्या म्हणाल्या, मी अजितदादांचं अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. त्यांनी आता बीडमध्ये रेल्वेचा आणि एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा आहे. शिवाय आपल्याला विनंती आहे की, बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न राबवावा. निश्चितपणे बीडचे कष्टाळू आणि अत्यंत प्रामाणिक आणि कष्टासाठी चोख असणारे लोक आपल्याला निराश करणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.