Dharashiv News : गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक होत असल्याने महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. 2018 साली झालेल्या स्थानिकच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार सुरेश धस आणि ऐनवेळी मैदानात उतरलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात चुरशीची लढत झाली होती.
त्यावेळी धस यांनी महविकास आघाडीची जवळपास 100-125 मते फोडून 72 मतांनी विजय मिळवत चमत्कार घडवला होता. त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून तगडा व अनुभवी उमेदवार रिंगणात उतरवला जाणार असल्याने त्यांच्या या भूमिकेने धाकधूक वाढली आहे. या मतदारसंघाचा जुना इतिहास पाहता याठिकाणी पुन्हा मतांची फोडाफोडी होऊन पुनरावृत्ती होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
2018 च्या निवडणुकीत या मतदारसंघातील आकड्यांचा खेळ आणि घोडेबाजारामुळे ही निवडणूक रंजक ठरली होती. बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक त्यावेळी धक्कादायक निकाल, वेगवान राजकीय घडामोडी, कुरघोडी आणि मतांमधील फूट यामुळे आजही सर्वांना आठवते. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेचा, सर्वात महागडा आणि कमालीच्या नाट्यमय घडामोडींसाठी ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त जागेसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. या ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या (BJP) वाट्याला जागा जाणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला ही जागा येणार असल्याने या मतदारसंघातून माजी आमदार धीरज देशमुख, अशोक जगदाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात एकूण 881 मतदार आहेत. बीड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक झालेली नाही. त्यामध्ये भाजपचे 301, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 68, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 138 असे एकूण 537 सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस 155, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 32, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 54 असे एकूण 241 सदस्य महविकास आघाडीचे आहेत. त्याशिवाय अपक्ष 25, छोटे पक्ष व विविध आघाडीचे 78 जणांना मतदानाचा अधिकार आहे.
धाराशिव-बीड-लातूर या मतदारसंघाचा इतिहास पाहता या ठिकाणी 1994 मध्ये काँग्रेसकडून नरेंद्र बोरगावकर विजयी झाले होते. त्यानंतर 2000, 2006 व 2012 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेस नेते दिलीप देशमुख यांनी हॅट्ट्रिक केली होती. तर त्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेसला सोडत अदलाबदल करण्यात आली होती. यावेळेस संख्याबळानुसार धाराशिव-बीड-लातूर ही जागा काँग्रेस लढण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे यंदा या जागेवर भाजपकडून माजी आमदार बसवराज पाटील, धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अर्चना पाटील-चाकूरकर, नितीन काळे यांची नावे चर्चेत आहेत.
2018 च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, अचानक नाट्यमयरित्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. कराडांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीसह धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला. ही माघार इतक्या ऐनवेळी घेतली गेली की, राष्ट्रवादीला सावरण्याची संधीच मिळू दिली गेली नाही. राष्ट्रवादीकडे स्वतःचा अधिकृत उमेदवारच उरला नाही आणि हा पक्ष अक्षरश: हतबल झाला. धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या नेत्यांकडे भांडून रमेश कराड यांना उमेदवारी मिळवून दिली होती. पण त्यांनीच ऐनवेळी दगा दिला आणि धनंजय मुंडे तोंडघशी पडले. त्यामुळे भाजप उमेदवार सुरेश धस बिनविरोध निवडून येण्याची शक्यता होती.
धनंजय मुंडे व धाराशिव जिल्ह्यातील सध्या भाजपमध्ये असलेल्या एका नेत्याने तातडीने हालचाल करत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यासोबत येडशी येथील टोलनाक्यावर बैठक घेत मनधरणी केली होती. त्यांनी शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांच्या बंगल्यावर बसवले होते. त्यांनतर या नेत्यांनी जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या पाठीशी सगळी ताकद झोकून दिली. पण जेव्हा निवडणूकीचा निकाल लागला तेव्हा भाजपच्या सुरेश धस यांनी चमत्कार घडवला होता.
या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने असताना त्याठिकाणी 100 ते 125 मतदार भाजपने फोडत विजय मिळवला होता. सुरेश धस यांनी 524 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस-आघाडीच्या अशोक जगदाळे यांचा 452 मते घेऊनही पराभवच झाला. 72 मतांच्या फरकाने सुरेश धस यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती.
2018 च्या निवडणुकीत ऐनवेळी अपक्ष उमेदवार म्हणून अशोक जगदाळे यांनी लढवली होती. त्यामुळे जगदाळे यांनी ही निवडणूक पुन्हा लढविण्याची तयारी सुरु केली असल्याचे समजते. गेल्या काही दिवसापासून त्यांनी या मतदारसंघातील जनसंपर्क वाढवला आहे. काँग्रेसने उमेदवारी दिल्यास ही निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे जगदाळे यांनी स्पष्ट केले आहे. सध्यस्थितीत काँग्रेसकडून माजी आमदार धीरज देशमुख व धाराशिव जिल्हयातील काँग्रेस नेते अशोक जगदाळे यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसकडून या दोन नावापैकी एक नाव फायनल करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.