Mumbai News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीबाबतचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भाजपसह महायुती किंवा महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षानं विधानपरिषदेसाठी आपल्या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल करण्यास अवघे दोन दिवस बाकी राहिले आहे. याचदरम्यान, या निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी असा अट्टाहास महाविकास आघाडीकडून केला जात आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दहावा उमेदवार मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे मविआच्या गोटात खळबळ उडाली आहे.
परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध केल्यामुळे माजी खासदार संजय निरुपम हे चांगलेच चर्चेत आले आहेत. आता त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठं विधान केलं आहे. शिवसेना म्हणून आम्ही दहावा उमेदवार आम्ही देऊ शकतो, अशी चर्चा सुरू असल्याचं निरुपम यांनी सांगितलं.
तसेच शिवसेनेचे दोन उमेदवार निश्चितच संख्याबळाच्या जोरावर निवडून येतील. पण उरलेली मतं आणि अनेक छोटे पक्ष, अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. जर असं ठरलं की, आणखी एक उमेदवार मैदानात उतरवला पाहिजे, तर तसे होऊ शकते असा नवा राजकीय बॉम्ब शिवसेना नेते संजय निरुपम यांनी टाकला आहे.
निरुपम म्हणाले, आमच्या शिवसेनेचा दहावा उमेदवार कोणाच्याही अर्थात उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला जोडून राहणार नाही. तो आमच्या संख्याबळाप्रमाणे राहणार असून आमचा संख्याबळावर विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर कोण आहे? यातून काही फरक पडत नसून दहाव्या उमेदवारीबाबत शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे का?, हेही मला माहीत नसल्याचा दावाही संजय निरुपम यांनी केला आहे.
संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते नाहीत की, त्यांच्यासाठी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करावी असं विधान करत जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा फरक आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर असल्यानं त्यांच्यासमोर उमेदवार न देण्याची भावना असू शकते. मात्र, ठाकरे एवढे मोठे नेते नाहीत की, त्यांच्यासाठी थेट राज्याची विधान परिषद निवडणूकच बिनविरोध करावी असा टोलाही निरुपम यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येत असल्याने याठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जागा रिक्त होत असल्याने ही जागा त्यांनीच लढावी असा आग्रह काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे निवडणूक लढविण्याबाबत ठाम नाहीत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम असून त्यामुळेच या एका जागेसाठी मित्रपक्षांचा दबाव वाढला असला तरी महाविकास आघाडीत 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहवयास मिळत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मविआत कोणत्याच विषयवार एकमत होत नसल्यानं ठाकरेंची भेट घेत पुन्हा निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे तुम्ही निवडणूक लढणार नसाल, तर ही मविआची एक जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली आहे.
त्यासोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी विनंती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या नावाची चर्चा महाविकास आघाडीत जोरदार पाहावयास मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.