Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानावर उत्साही वातावरणात पार पडला. यामध्ये मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर लगेचच राज्यातील घडामोडीना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून शिवसेनेकडून मंत्रिपद देताना कठोर निकष लावणार असल्याचे समजते. त्यामुळे तीन विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde news)
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून होण्याची शक्यता आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता महायुतीमधील भाजप, शिवसेना (Shivsena) शिंदे गट, राष्ट्र्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात खाते वाटपावरून मोठी चुरस पाहवयास मिळत आहे. त्यामध्ये गृह, अर्थ, नगरविकास, महसूल व जलसंपदा या खात्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व मंत्र्यांच्या कामाचं मुल्यांकन करुन निर्णय घेतला जाईल, तिन्ही पक्षांना मंत्रिपदं द्यायची असल्यानं काही प्रमाणात मागे पुढे होईल, अशी माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याची उत्सुकता लागली असतानाच एकनाथ शिंदे (Eknath shinde) कठोर निकष लावणार असल्याचे समजते. मंत्रिपदाची जबाबदारी देत असताना पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचे समजते. शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय?, याचा विचार मंत्रिपद देताना केला जाणार असल्याचे समजते.
या निकषासोबतच निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचारसुद्धा केला जाणार आहे. त्यासोबतच ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिले जाणार नाही. तर यंदाच्या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या तीन विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या तिघांविरोधात अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यांच्या बाबतीत उपमुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात.
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, निलेश राणे यांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांची नावे नसल्याने त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.
गृह खाते कोणाच्या वाट्याला ?
महायुतीच्या तीन घटक पक्षात गृह खात्यावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. गृह खाते शिवसेनेच्या वाटेला यावे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. आमचे मंत्रिपदांचे वाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. गृहखाते तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असे उत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.