Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT : 'जय भवानी, जय शिवाजी' बोलून मतं मिळवण्याचे दिवस गेले..., ठाकरेंच्या नेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत

Ambadas Danve Statement : शिवसेनेतील फुटीनंतरच्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला करत मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन सुरू केल्याची टीका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आपलं मूळ रूप बाजूला सारत नवीन काही प्रयोग करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Jagdish Patil

Raigad News, 30 Jan : भाजपची साथ सोडून राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नवं समीकरण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या जोडीने उदयास आणलं आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून वैचारिक विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठाकरे गेल्याने अनेकांना त्यावेळी धक्का बसला होता. त्यामुळे साहजिकचं शिवसेनेतील काही नेत्यांना त्यांची ही भूमिका आवडली नव्हती.

याबाबतची नाराजी अनेकांनी उघड बोलून देखील दाखवली होती. दरम्यानच्या काळात भाजपने शिवसेनेला सुरूंग लावत एकनाथ शिंदेंना (Ekath Shinde) आपल्याकडे आणलं. त्यानंतरच्या राजकीय उलाढालीत उद्धव ठाकरेंनी अनेक वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज अशी ओळख असलेल्या ठाकरेंनी, 'आमचं हिंदुत्व हे भाजपसारख शेंडी जानव्याचं नाही'; असं म्हणत आपल्या हिंदुत्वाची नवी व्याख्या निर्माण केली.

शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतरच्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला करत मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन सुरू केल्याची टीका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आपलं मूळ रूप बाजूला सारत नवीन काही प्रयोग करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

अशातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ठाकरेंची शिवसेना आता खरंच बदलली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण शिवसेनेची ओळख असणारी घोषणा म्हणजे 'जय शिवाजी, जय भावानी' मात्र, आता 'जय भवानी जय शिवाजी बोलून मतं मिळवायची दिवस गेल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. विधानसभेतील पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते अंबादास दानवे हे या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थीत होते.

जय भवानी जय शिवाजी बोलून मतं मिळवायचे दिवस गेले

यावेळी त्यांनी शिवसैनिकांना अनेक सूचना आणि सल्ले दिले. मात्र, यावेळी त्यांनी, जुना काळ गेला आता 'जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मतं मिळवायचे दिवस गेले, असं वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, दानवेंना भावनिक मुद्दांवर मते न मागता मतदारांच्या प्रश्नांवर लक्ष द्या, असं तर शिवसैनिकांना सुचवायचं तर नसेल ना? अशीही चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT