Ajit Pawar | Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : 'मी पक्षाच्या शिबिराला आलोय, कुणा व्यक्तीच्या नव्हे'; अजितदादांवरील नाराजी घेऊनच भुजबळ सहभागी

"Bhujbal joins party camp amid discontent over Ajitdada's leadership. He clarifies that his participation is for the party, not any individual : शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होत असलेल्या नवसंकल्प शिबिरासाठी दाखल झालेले जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेत नाराजीच अधिक जाणवली.

Pradeep Pendhare

Shirdi News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आपल्या नाराजीसह शिर्डी इथल्या नवसंकल्प शिबिरात दाखल झाले. 'हे पक्षाचे शिबिर आहे, कुणा एका व्यक्तीचे नव्हे', अशी माध्यमांना प्रतिक्रिया देत छगन भुजबळ यांनी शिबिराला हजेरी लावली. छगन भुजबळ यांच्या या प्रतिक्रियेत अजित पवार यांच्यावरील नाराजी स्पष्ट होती.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) शिबिरात सहभागी होणार की, नाही याबाबत उलटसुलट चर्चा होती. परंतु त्यांनी शिबिराला हजेरी लावली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीच्या चर्चेंना काहीसा पूर्णविराम मिळाला. शिबिरात दाखल होण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

छगन भुजबळ म्हणाले, "हे पक्षाचे शिबिर आहे, कुणा एका व्यक्तीचे नाही. मी थोडा वेळ आलो आहे. यामुळे सगळं काही स्वच्छ झाले, असे होत नाही". छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेमध्ये नाराजी अधिक स्पष्टपणे दिसत होती. त्यांच्या या नाराजीचा रोख पक्षाचे अध्यक्ष (Ajit Pawar) अजित पवार यांच्याकडे अधिक होता.

शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार की नाही, यावर बोलताना, त्यांनी चुप्पी साधली. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही प्रभावशाली ठरली असती. त्यांनी थोडा वेळ का होईना, शिबिराला हजेरी लावावी, यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मोठे प्रयत्न केले.

'प्रफुल्ल पटेल हे माझ्याकडे दोन तास येऊन बसले होते. तसेच सुनील तटकरे यांनी मी शिबिराला यावं यासाठी खूप काही फोन केले. त्यामुळे मी थोडा वेळ शिबिरात सहभागी होण्यासाठी आलो आहे', असे छगन भुजबळ यांनी सांगितले. परंतु हे शिबिर दोन दिवस चालणार आहे. त्यामुळे शिबिरात दोन दिवस उपस्थित राहणार की, नाही राहणार यावर छगन भुजबळ यांनी मौन बाळगणे पसंत केले.

मला पक्षाकडून राज्यसभेचा प्रस्ताव होता. परंतु मला राज्यातच काम करायचे आहे. हे पूर्वी सांगितले आहे. नाशिकच्या येवलेकरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासावर काम करायचे आहे, असे सांगून राज्यातच काम करण्यावर ठाम असल्याचे मत छगन भुजबळ यांनी पुन्हा यावेळी व्यक्त केले. समता परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत आहे, यावर छगन भुजबळ यांनी परिषदेचे काम चालूच राहणार, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT