Jayadatt Kshirsagar Likely Join BJP Sarkarnama
महाराष्ट्र

Jaydatta Kshirsagar News: जयदत्त क्षीरसागरांच्या भाजप प्रवेशासाठी पंकजा ठरताहेत अडसर?

Jayadatt Kshirsagar Likely Join BJP: जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Jagdish Pansare

Beed Politics News: माजी मंत्री व बीड जिल्ह्यातील बडे नेते जयदत्त क्षीरसागर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौर्‍यात पुन्हा त्यांच्या कानात कुजबुज करताना दिसले. या आधी नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी बीडमध्ये आलेल्या फडणवीस यांच्या दौर्‍यात हेच चित्र दिसले होते.

गेल्या वर्षभरापासून जयदत्त क्षीरसागर हे भाजपामध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहे. परंतु जिल्ह्यातील भाजपा नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा या प्रवेशासाठी अडसर ठरतोय का? असा प्रश्न क्षीरसागर यांच्या भूमिकेवरून अनेकांना पडला आहे.

देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले की त्यांच्यासोबत आणि कानात कुजबुज करताना दिसणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर देवाभाऊंची पाठ फिरल्यानंतर मात्र पुन्हा भाजपाच्या कुठल्याच कार्यक्रमात, व्यासपीठावर किंवा पंकजा मुंडें यांच्यासोबत दिसत नाही. त्यामुळे नेमकी जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका काय? याबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्या सारखा नेता गेल्या वर्ष-दीड वर्षापासून राजकारणापासून अलिप्त आहे.

बीड जिल्ह्यातील राजकारण मराठा आरक्षण, त्यातून झालेली आंदोलन, दोन समाजात वाढलेली कटुता, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यातून घडलेल्या राजकीय घडामोडी यापासूनही क्षीरसागर यांनी स्वतःला लांब ठेवले. नगरपालिका निवडणुकीत एका पुतण्याला साथ देण्यासाठी ते भाजपासोबत अप्रत्यक्षरित्या राहिले. योगेश क्षीरसागर यांना मदत म्हणून त्यांनी प्रचारही केला. नगरपालिकेत भाजपाच्या जागा वाढल्या, पण सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच राखली.

या सगळ्या प्रचारा दरम्यानही जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत किंवा भाजपाच्या कार्यक्रमात थेट सहभागी होणे टाळले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधणारे जयदत्त क्षीरसागर जिल्ह्यातील नेत्यांना मात्र फारशी किंमत द्यायला तयार नाहीत.

थेट राज्याच्या सुप्रीम नेत्याशी संपर्क आणि त्यातून आपल्या प्रवेशासाठीची योग्य रणनीती जयदत्त क्षीरसागर आखू पहात आहेत. भाजपामध्ये प्रेवश केला तरी आपले जिल्ह्यातील स्थान आणि अस्तित्व कायम राहावे, त्याला कुठेही कोणाकडून बाधा पोहचू नये, यासाठीच हे प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

मुंडे-क्षीरसागर यांच्यात दुरावा..

बीड जिल्ह्याच्या राजकारणात एकाच म्यानात जशा दोन तलवारी राहू शकत नाही, तसे भाजपामध्ये जयदत्त क्षीरसागर आणि पंकजा मुंडे यांची गत झाली आहे. चार-पाच वर्ष राजकीय संघर्ष केल्यानंतर आता कुठे पंकजा मुंडे यांची राजकीय बस्तान आता पुन्हा बसले आहे. फडणवीस-पंकजा मुंडे यांच्यातीत कटुता नाहीसी होऊन परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. अशात जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजपा प्रवेशाने बीड जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा संघर्षाचा भडका उडू शकतो.

पुर्वी काही काळ पंकजा मुंडे-जयदत्त क्षीरसागर यांच्यातील राजकीय संबंध बरे होते. पंकजा मुंडे- जयदत्त क्षीरसागर हे ऐकमेकांना भेटायचे, बोलायचे. पण आता हे सगळं थांबलं आहे. दोघांमध्ये दुरावा आणि अबोला असल्याने हे दोन मोठे नेते एकाच पक्षात एकत्र आले तर कसे अॅडजेस्ट होणार? हा खरा प्रश्न आहे. जयदत्त क्षीरसागर यांना भाजपा प्रवेशानंतर आपल्या कामात कुणाचाही हस्तक्षेप नको, असा शब्द देवाभाऊ यांच्याकडून हवा आहे.

आता कुठे पंकजा मुंडे यांची नाराजी कमी करण्यात यश आले आहे, तर पुन्हा त्यांना व त्यांच्या समर्थकांना दुखावणे योग्य ठरणार नाही, या विचारातून फडणवीस क्षीरसागर यांचा पक्ष प्रवेश करून घेत नाहीयेत, अशीही चर्चा आहे. नगरपालिकेत विरोधी बाकावर बसावे लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्षाचा कामगिरीवर नाराज आहेत. पकंजा मुंडे यांच्या सांगण्यावरून योगेश क्षीरसागर यांचा पक्ष प्रवेश करून घेत त्यांच्या म्हणण्यांनुसार उमेदवार दिले गेले. पण पक्षाला सत्ता खेचून आणता आली नाही.

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे चित्र फडणवीस यांना बदलायचे आहे. या पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर आणि त्यांच्या वाढती जवळीक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. जयदत्त अण्णाच्या हाती कमळ देण्याआधी मुख्यमंत्र्‍यांना पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यात समेट घडवून आणावी लागणार आहे. दोघांच्या समन्वयातूनच भाजपाला जिल्हा परिषदेची सत्ता आणि पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी करता येणार आहे.

म्हसोबाची वाडी येथील नारळी सप्ताहाच्या समाप्ती कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली. अगदी गाडीत बसल्यानंतरही या दोन नेत्यांमध्ये कानात कुजबुज सुरू होती. चार महिन्यात या दोन नेत्यांमधील ही दुसरी भेट होती. भेटीगाठी सुरू असल्या तरी जयदत्त क्षीरसागर अजूनही भाजपाचे कमळ हाती का स्वीकारत नाहीत? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे. राज्यभरात अनेक दिग्गजांचे पक्षप्रवेश सोहळे घेतले जात आहेत. यात जयदत्त क्षीरसागर यांचा नंबर कधी लागणार? याची वाट त्याचे समर्थक आणि बीड जिल्ह्यातील राजकीय मंडळी आतुरतेने पाहत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT