Mahad News : सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी (दि.११ ) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. न्यायालयानं शिंदे गट आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे काही निर्णय चुकीचे ठरवले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली असंही मत नोंदवलं. शिंदे गटानं भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्तीही बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
याचवेळी राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार कायम राहिलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील आणि भाजपाच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. याचवेळी गोगावलेंनी मोठं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकार(Shinde Fadnavis Government) महाराष्ट्रात कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. शिंदे गटातील इच्छुक नेतेमंडळी मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत.
शिंदे गटाचे आमदार व प्रवक्ते संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनंतर मंत्रिमंडळ विस्तारावर सर्वात प्रथम भाष्य केलं होतं. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, ज्यामध्ये 20 आमदार मंत्री होतील. सध्या एकूण २० आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. या सर्वांना संधी दिली जाईल असेही ते म्हणाले होते. तसेच केंद्रिय मंत्री मंडळात 2 जण मंत्री होतील असंही शिरसाट म्हणाले होते. याचदरम्यान, गोगावले यांनी मंत्रिपदारून सूचक वक्तव्य केलं आहे.
महाडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे. ''पक्षप्रतोद पद गेलं, आता मंत्रिपद घेऊन येतोच'' असं विधान शिवसेना आमदार भरत गोगावले(Bharat Gogawale) यांनी केलं आहे. यामुळे गोगावले यांना कुठलं मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, आता गोगावले यांनी आता मंत्रिपद घेऊन येतोच असं विधान केल्यानं सध्या महाडमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
बच्चू कडू मंत्रिपदावर काय म्हणालेत?
येत्या २१ ते २६ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. जर मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला नाही तर तो २०२४ नंतरच होईल. असे देखील बच्चू कडू म्हणाले. एकंदरीत ज्या काही वार्ता कानावर येत आहेत त्यावरून मी हे सांगतोय. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पुढे माध्यमांनी तुम्ही मंत्रिमंडळात दिसणार का असा प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, मी मंत्रिमंडळात कधी येईन हे सांगता येत नाही. परंतु दिलेला शब्द पाळणार हे मात्र निश्चित आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.