Narayan Rane-Uddhav Thackeray
Narayan Rane-Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Kankavli News : राणेंच्या होम पिचवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला कडवे आव्हान

सरकारनामा ब्यूरो

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली (Kankavli) तालुक्यामध्ये थेट सरपंच (Sarpanch) निवडणुकीमध्ये ४९ ग्रामपंचायतीसाठी ११८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र, बहुतांशी ठिकाणी भाजप (केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray) थेट लढत होत आहे. दोन्ही पक्षांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवारांमध्ये ही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दोन्हीकडून घरोघरी प्रचारावर भर देण्यात आला असून खऱ्या अर्थाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची ही रंगीत तालीम मानली जात आहे. (Direct fight between BJP and Shiv Sena for Gram Panchayat in Kankavli)

कणकवली तालुका हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गृहतालुका आहे. या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने शिवसेना विरोधात नारायण राणे यांचा गट भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरला आहे.

कणकवली तालुक्यातील ६३ पैकी ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या खऱ्या पण सहा ठिकाणी थेट सरपंचांसह ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. तीन ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. येथे शिवसेना आणि भाजपने आपला दावा केला असला तरी खरी रंगत ही निवडणुकीत उतरलेल्या थेट सरपंच पदासाठी आहे.

तालुक्यात दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढती सरपंच पदासाठी आहेत. मात्र, भाजपने यासाठी जोर लावला आहे. शिवसेनेत गटबाजी झाल्यानंतर दोन गटांमध्ये लढत न होता खरी लढत ही भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्येच पाहायला मिळत आहे. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

यंदा मोठ्या सभांवर कोणीही भर दिलेला नाही. पण, आमदार नीतेश राणे हे प्रभावीपणे आपल्या मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायती मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. शिवसेनेच्या वतीने उपनेते गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक, शैलेश भोगले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

या विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद आहे. याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ही जोरदार मुसंडी मारत बहुतांशी ठिकाणी सरपंच थेट लढतील उतरवले आहेत. खऱ्या अर्थाने आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही रंगीत तालीम ठरणार आहे. या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत मिळवण्यासाठी राणे प्रभावीपणे कामाला लागले आहेत. गेली महिनाभर ते आपल्या मतदारसंघात ठाण मांडून आहेत. ही निवडणूक गावपातळीवर असल्याने स्थानिक मुद्द्यांवरच भर आहे. प्रस्थापितांविरोधात मत गोळा करण्यासाठी प्रत्येकाने आपाआपली रचना आखली आहे. त्याप्रमाणे सध्या घरोघरी प्रचारावरच भर आहे.

यंदा सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर सुरू आहे. तसेच, पत्रके वाटप, निशाणी समजून सांगण्यासाठी घरोघरी इलेक्ट्रॉनिक डुप्लिकेट मशीनद्वारे मतदारांना पुन्हा एकदा आपली निशाणी समजून सांगितली जात आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तरी वादीवाद पुढे आला नसला तरी पोलीसांनीही सतर्कता ठेवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT