Kharghar SIR case 3400 enumeration forms found : नवी मुंबईतील खारघरमध्ये SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदारांकडून भरून घेण्यात आलेल्या गणना प्रपत्रांच्या (Enumeration Forms) अनधिकृत झेरॉक्सचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाच बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांना निलंबित केले असून, त्यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्तावही ठेवला आहे.
नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघरमधील एका झेरॉक्स सेंटरवर गणना प्रपत्रांच्या प्रती काढल्या जात असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर मतदान अधिकारी आणि सहायक मतदान अधिकाऱ्यांनी संबंधित झेरॉक्स सेंटरची तपासणी केली. या तपासणीत सुमारे 3,400 गणना प्रपत्रे आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
ही प्रपत्रे एकूण 11 मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यापैकी पाच मतदान केंद्रांवरील प्रपत्रांची संख्या तुलनेने अधिक होती, तर अन्य सहा मतदान केंद्रांवरील प्रत्येकी एक प्रपत्र आढळल्याचे सांगण्यात आले. गणना प्रपत्रे अनधिकृतपणे ताब्यात ठेवणे तसेच त्यांची झेरॉक्स काढणे हे नियम आणि कायद्याच्या विरोधात असल्याचे जिल्हाधिकारी (Collector) जावळे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात सुरज पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संबंधित व्यक्तीविषयी राजकीय दावे-प्रतिदावेही सुरू झाले आहेत. सुरज पाटील हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.
या प्रकरणाच्या चौकशीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पाच BLO यांच्या दप्तरांमधून 100 पेक्षा अधिक गणना प्रपत्रे हस्तांतरित झाल्याचे आढळून आले, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पाचही BLO यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
खारघरमधील गणना प्रपत्रांच्या झेरॉक्सच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणही तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.