Ratnagiri-Sindhudurg Consrituency: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी परवा मंगळवारी (7 मे) रोजी मतदान पार पडलं. या टप्प्यातील अनेक मतदारसंघापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही लक्षवेधी ठरली. या मतदारसंघात शिवसेनेचं पारडं जड असलं तरी शिवसेनेत झालेल्या बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे इथला मतदारदेखील विभागला गेला होता. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency Election 2024)
शिवाय या मतदारसंघावरुन महायुतीतच रस्सीखेंच सुरु होती. अखेर युतीने किरण सामंत यांची समजूत काढत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी दिली. भाजप-शिवसेना युतीत परंपरागत ही जागा शिवसेनाच लढवत आली होती. मात्र ही जागा भाजपच्या खात्यात गेल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर या सर्व नाराजीनाट्यातच येथील मतदान पार पडले. मतदानानंतर आता या ठिकाणी नेमकं कोणाचा विजय होणार याबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1990 सालापासून शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व आहे. शिवाय यापूर्वीच्या निवडणुका सेनेच्या धनुष्यबाणावरच लढवल्या गेल्या आहेत. काँग्रेसचा खासदारदेखील इथून निवडणून गेला आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ चिन्हावर इथून निवडणूक लढवण्यात आली आहे. कोकण आणि धनुष्यबाण असं समीकरण यंदा मोडीत काढण्यात आलं. शिवसेना शिंदे गटाने अनेक प्रयत्न करुन त्यांनाही जागा आपल्याकडे खेचून आणता आली नाही. त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देण्यात आली. मात्र, या मतदारसंघात नाराज शिंदेच्या सेनेसह राष्ट्रवादीचे देखील वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.
शिंदे सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी ते पहिल्यापासून इच्छुक होते. शिवाय ही उमेदवारी सामंत यांनाच मिळणार अशा चर्चा देखील सुरु होत्या. परंतू ऐनवेळी किरण सामंत यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सांगितलं. त्यानंतर काही क्षणातच भाजपने नारायण राणे यांची उमेदवाराची जाहीर केली. नाराज किरण सामंत आणि शेवटच्या क्षणाला राणेंना दिलेल्या उमेदवारीमुळे या लढतीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये, दोडामार्ग-सावंतवाडी, कुडाळ-मालवण, कणकवली-देवगड, राजापूर-लांजा-साखरपा, रत्नागिरी-संगमेश्वर, चिपळूण-संगमेश्वर हे मतदारसंघ येतात. तर या मतदारसंघात एकूण 14 लाखांहून जास्त मतदार आहेत. त्यामुळे या भल्यामोठ्या मतदारसंघामध्ये प्रचार करणे, प्रचार यंत्रणा राबवणे एवढं सोपं नाही. शिवाय हा कोकण भाग दुर्गम असल्याने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत असणं गरजेचं आहे.
या मतदारसंघात उमेदवार कोणीही असलं तरी येथील मुख्य लढत ही ठाकरे विरुद्ध राणे अशीच होणार हे सर्वांना माहिती होतं. त्यामुळेच दोन्ही नेत्यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघांमध्ये आघाडीचे विनायक राऊत (Vianayak Raut) आणि महायुतीचे नारायण राणे यांच्यासह एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. 14 लाख 51 हजार 630 इतकी मतदारांची संख्या आहे. इथे जवळपास 62 टक्के मतदान झाले. या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांची संख्या जास्त आहे. या विधानसभा मतदरासंघात चिपळूण-संगमेश्वर या विधानसभेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम, तर रत्नागिरी-संगमेश्वरचे आमदार उदय सामंत, कणकवलीत नितेश राणे, सावंतवाडी-दोडामार्गचे दिपक केसरकर हे महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात राणेंना मिळणारा पाठिंबा चांगला असल्याचं दिसत आहे.
या मतदारसंघात स्थानिक राजकारणाचा मोठा प्रभाव दिसून येतो. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील काही भागात राणे कुटुंबाची ताकद जास्त आहे तर काही भागात शिवसेना मजबूत आहे. रत्नागिरीतील राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना, रत्नागिरीत सामंत बंधू तर चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेची ताकद आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण शिवसेनेच्या फुटीनंतर पदाधिकाऱ्यांनी पक्ष बदलला आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्ते मात्र ठाकरेंसोबत राहिले. या सर्व गोष्टींचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला. शिवाय मुस्लिम, दलित समाज आणि ख्रिश्चन समाजाची भूमिका देखील या मतदानामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय कोकणातील विकास, रोजगाराच्या संधी अनेक दिवसांपासून वादात असणारे रिफायनरीसारखे प्रकल्प या सर्व गोष्टींचा या निवडणुकीत परिणाम दिसून येणार आहे.
किरण सामंतांना या मतदारसंघातून उमेदवारी पाहिजे होती. शिवाय त्यांना ती मिळेल असं वाटत असतानाच अचानक नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) अधिक अवघड झाल्याचं म्हणलं जात आहे. शिवाय भाजपची तगडी प्रचार यंत्रणा आणि तर ठाकरे गटाचा तळागाळापर्यंत असलेला जनसंपर्क यामुळे निवडणूक चुरशीची झाली होती. सुरुवातीला या ठिकाणी ठाकरे गटाचं पारडं जड असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र शेवटच्या दिवसांमध्ये इथली राजकीय परिस्थिती बदलल्याचा अंदाज काही अभ्यासकांनी लावला.
या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत किरण सामंत नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा, ठाकरे गटाने केलेले गंभीर आरोप, तर दोन्ही बाजूनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी झालेला साम-दाम-दंडचा वापर यामुळे इथून दिल्लीत नेमका कोणता उमेदवार जाणार? हे सागणं कठीण झालं आहे. त्यामुळे इथल्या मतदारांनी आपली पसंती कोणाला दिली ते 4 जूनला कळेलचं परंतु राणे आणि राऊत यांच्यात होणारी लढत ही चुरशीची असणार आहे यात काही शंका नाही.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.