रायगड जिल्ह्यातील महायुतीत फूट पडली असून, महाडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सेनेला वगळून थेट युती केली आहे.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी १५ जागा राष्ट्रवादीला आणि ५ जागा भाजपला देण्याचे गणित निश्चित झाल्याचे सांगितले.
नगराध्यक्षपदाबाबतची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
Raigad News : रायगड जिल्ह्यातील महायुतीतील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वादाचा स्फोट झाला आहे. येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात सुरू झालेला वादाची ठिणगी युतीत पडली आहे. सतत तटकरे यांच्यावर होणार्या टीकामुळे येथे राष्ट्रवादीने शिवसेनेशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपशी युती केलीय. यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलली असून राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असूनही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. रायगडमध्ये तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विस्तवही जात नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. येथे थेट शिवसेने विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद-प्रतिवाद पाहायला मिळत आहे.
त्यातच आता नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत बिघाडी झाल्याचे समोर आले असून या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आमने-सामने आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षासोबत युती करत जागा वाटपाची घोषणा देखील केली असून थेट शिवसेनेला युतीच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच ज्या शिवसेनेला राष्ट्रवादी नको होती. त्याच राष्ट्रवादीने आम्हाला शिवसेनेशी गरज नाही म्हणत थेट भाजपशी युती केल्याची घोषणा केली आहे.
रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उभा वाद सुरू झाला. यावेळी शिवसेनेनं जिल्ह्यात एकाच वेळी भाजप आणि राष्ट्रवादीला अंगावर घेतले. पण आता शिवसेनेचे हाच आक्रमकपणा अंगलट आल्याचे दिसत असून महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युती झाली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची घोषणा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी, महाड नगर पालिकेत 15 जागा राष्ट्रवादी आणि 5 जागा भाजपला देण्यात येतील असे सांगत जागा वाटपाचा हाच फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले आहे. तसेच नगराध्यक्ष पदाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घोषणा करतील असेही म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या या घोषणेमुळे आता रायगडमध्ये युतीत अधिकच बिघाडी होणार असून याचा इतर ठिकाणीही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात सतत सत्तेत असणारी शिवसेना आता या धक्क्याला कसे उत्तर देते हे पाहावे लागणार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप बाजी मारणार की शिवसेना हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे.
1. महाडमध्ये कोणत्या पक्षांनी युती केली आहे?
महाड नगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे.
2. शिंदे सेनेला या युतीत स्थान मिळाले आहे का?
नाही, शिंदे सेनेला या युतीतून वगळण्यात आले आहे.
3. युतीतील जागांचे वाटप कसे झाले आहे?
१५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि ५ जागा भाजपला देण्यात येणार आहेत.
4. नगराध्यक्ष पदाबाबत निर्णय कोणी घेणार आहे?
नगराध्यक्ष पदाबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करतील.
5. या युतीचा रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
या युतीमुळे रायगडमधील महायुतीत तणाव वाढला असून आगामी निवडणुकांमध्ये समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.