Thane District Politics : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमधील सर्वच पक्षांनी जोरदार इनकमिंग करून घेतलं. पण आता उमेदवारी वाटताना, हे इनकमिंगचं सत्तेतील पक्षांची डोकेदुखी ठरली आहे. उमेदवार न मिळाल्याने राज्यात सत्ताधारी पक्षांमधील कार्यकर्त्यांचा उद्रेक उफाळून आला आहे.
भाजपखालोखाल याचा सर्वात जास्त फटका, एकनाथ शिंदे शिवसेनेला बसला आहे. एकनाथ शिंदेंच्या होम ग्राऊंडवर ठाणे जिल्ह्यात जोरदार राजकीय हादरे बसले आहेत. ठाण्याच्या टेंभीनाक्यापासून सुरू झालेले हे राजकीय हादरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यभरात बसले आहे. ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक नंतर आता नागपूरमध्येही शिवसेनेत राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील टेंभीनाका हे राज्यात राजकीय केंद्रबिंदु आहे. दिवंगत शिवसेना (Shivsena) नेते आनंद दिघे यांच्यामुळे या परिसराला राजकीय महत्त्व प्राप्त झाले, त्यांचे कार्यालय 'आनंद आश्रम' हे सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याचे केंद्र होते. आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्याचं राज्याचं महत्त्व टिकवलं आणि वाढवलं. शिवसेनेतील बंडाळीनंतर आनंद दिघे यांचा टेभींनाका एकनाथ शिंदेंनी राजकीय केंद्र करत, राज्य गाजवलं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर, एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नगरपालिकांनंतर, महापालिका निवडणुकीत, एकनाथ शिंदे यांनी कस लावला आहे. परंतु एकनाथ शिंदे शिवसेनेला महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या नाराजीनाट्याला, बंडखोरीला, राजीनामा सत्राला समोरे जावे लागत आहे.
टेंभीनामा शिवसेना शाखेचे प्रमुख निखील बुडजडे यांना ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी नाराजी पसरली आहे. निखील बुडजडे यांनी अपक्ष उमेदवारीची तयारी केली आहे. 'अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून मी समाज कार्यामध्ये काम करत आहोत, त्या समाज कार्याचं रूपांतर करण्यासाठी मी निवडणूक लढत आहे, माझी कोणावरती नाराजी नाही आहे,' असे निखील बुडजडे यांनी म्हटले आहे.
तसंच ठाणे जिल्ह्यातील युवा सेना अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, कोर कमिटी सदस्यचे नितीन लांडगे यांनी देखील एकनाथ शिंदे शिवसेना पदाचा राजीनामा दिला. पक्षात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे, रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय न मिळणे, तसेच प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या कष्टाळू कार्यकर्त्यांना डावलले जाणे, यामुळे मी अत्यंत व्यथित आहे. म्हणून माझ्या नैतिक जबाबदारीचा विचार करून आणि माझ्या स्वाभिमानाला जागून, नितीन लांडगे यांनी पदाचा राजीनामा दिला.
नागपूर इथले युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश तिघरे यांनी देखील राजीनामा दिला आहे. नीलेश तिघरे यांनी सन 2006 पासून शिवसेना भारतीय विद्यार्थी सेने मध्य शाखाप्रमुख ते आज युवासेना नागपूर जिल्हा प्रमुखपदापर्यंत कार्यरत होते. एकनिष्ठ राहून काम करताना, संघटनेत नेत्यांनी फक्त आणि फक्त माजी नगरसेवक प्राधान्य देऊन तिकीट वाटप केले. सामान्य शिवसैनिकांना केवळ पदांपुरते मर्यादित ठेवले जात असून, येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये योग्य संधी मिळत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे, असे सांगून राजीनामा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.