Narayan Rane Sarkarnama
कोकण

Narayan Rane : आघाडीत 'एक ना धड भाराभर चिंध्या'; नारायण राणेंचा काँग्रेसवर घणाघात

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg Political News : अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. देशातील ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण देऊनही काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी कार्यक्रमाला जाणे टाळले आहे. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोधकांवर सडकून टीका केली. तर आता काँग्रेसमध्ये काय राहिले आहे, असे म्हणत शेलक्या शब्दात काँग्रेसचा समाचारही घेतला.

राणे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण उद्या हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मोठ्या आनंदोत्सवात साजरा करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला कोणत्याही मंदिरात बोलावा, तेथे येईन असा शब्दही त्यांनी दिला. अयोध्या येथे होणार्‍या प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकापर्ण होत असल्याने राणेंनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली.

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, 'उद्याचा सण हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण आहे. गेले अनेक वर्षे भारतीयांच्या मनात शल्य होते. पण कोणीच हा विषय हाती घेतला नाही. मोदींनी तो विषय हाती घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला. आता ते स्वतः प्राणप्रतिष्ठा करत आहेत. मोदींनी आर्थिक प्रगतीसह सांस्कृतिक आणि धार्मिकतेला चालना दिली,' असे म्हणत राणेंनी मोदींचे कौतुक केले.

इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) राणेंनी जोरदार टीका केली. 'देशातील सर्व विरोधक मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. हे काँग्रेस आणि विरोधक नेमके देशासाठी काय करणार आहेत? काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत काय केले ते आधी सांगावे. काँग्रेस सोबत आलेले म्हणजे, एक ना धड भाराभर चिंध्या आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवणार,' अशा शब्दात राणे यांनी इंडिया आघाडीचा समाचार घेतला.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीतील बडे नेते नितीशकुमार (Nitishkumar) भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे. यावर राणे म्हणाले, 'काँग्रेसकडे गमावण्यासारखे काहीही राहिलेले नाही. नितीशकुमार हे मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना माहित आहे की कोणासोबत राहिलो तर देशाची प्रगती होईल. त्यांना माहिती आहे देशाचे प्रश्न सोडविण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत आले तर अधिकचे काम करता येईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंदिरात स्वच्छतेचा शुभारंभ

अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्या निमित्ताने राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील श्रीदेवी सातेरी मंदिरात स्वच्छता अभियान राबवले. या अभियानाचा शुभारंभ नारायण राणेंच्या हस्ते करण्यात आला. 'उद्या प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असलेले अयोध्येतील राम मंदिरातील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हे बघून आनंद होत आहे,' अशी भावनाही राणेंनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT