BJP Sagar Naik Sarkarnama
कोकण

Navi Mumbai Mahapalik : भाजपचे सागर नाईक अडचणीत? ‘दीड कोटींच्या मर्सिडीज भेटी’चा आरोप; 729 कोटींच्या कचरा प्रकल्पावरून राडा

Navi Mumbai Mahapalika : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांचा आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी; सागर नाईक म्हणाले, आरोप बिनबुडाचे असून पुरावे द्यावेत.

Pradeep Pendhare

Navi Mumbai civic body Mercedes allegation : तुर्भे येथील प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पावरून नवी मुंबई महापालिकेतील राजकारण तापले असतानाच, भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांच्यावरील कथित ‘मर्सिडीज कार भेटी’च्या आरोपाने वादाला नवे वळण मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत काळे कपडे आणि निषेधाचे पोस्टर घालून प्रवेश करत थेट सागर नाईक यांना लक्ष्य केले.

‘कचरा प्रकल्प घ्या अन् मर्सिडीज कार भेट मिळवा’, असा मजकूर असलेल्या पोस्टरमुळे महासभेपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक प्रकल्पाशी संबंधित गंभीर आरोपांमुळे आता या प्रकरणाची चौकशी होणार का आणि संबंधित आरोपांवर नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) नगरसेवक अंकुश कदम गेल्या काही दिवसांपासून तुर्भे वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. कदम यांच्या आरोपानुसार, या प्रकल्पाशी संबंधित सुमारे 729 कोटी रुपयांच्या कामात किंवा आर्थिक लाभात R&B ग्रीनटेक कंपनीचा संबंध आहे. याच कंपनीशी संबंधित एका उपकंपनीच्या माध्यमातून भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांना सुमारे दीड कोटी रुपयांची मर्सिडीज कार भेट देण्यात आल्याचा गंभीर दावा कदम यांनी केला आहे.

या कथित व्यवहाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, संबंधित कंपन्यांमधील आर्थिक व्यवहार तसेच वाहनाची खरेदी आणि मालकीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीसाठी कदम यांनी समर्थकांसह नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आंदोलनही केले होते.

आरोप बिनबुडाचे, तक्रार करा

या आरोपांना सागर नाईक यांनी ठामपणे फेटाळले आहे. विरोधकांकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधितांनी सक्षम प्रशासनाकडे तक्रार करावी, आपण चौकशीला आणि उत्तर देण्यास तयार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. मात्र, पुराव्याशिवाय आरोप सुरूच राहिल्यास आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महासभेत काळे कपडे, निषेधाचे पोस्टर

या वादाचे पडसाद आजच्या महासभेत उमटले. महासभा सुरू होताच शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे कपडे परिधान करून आणि निषेधाचे पोस्टर हातात घेऊन सभागृहात प्रवेश केला. ‘कचरा प्रकल्प घ्या अन् मर्सिडीज कार भेट मिळवा’, या घोषणात्मक पोस्टरमुळे सभागृहातील वातावरण तापले. महासभा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपच्या सत्ताधारी गटावर राजकीय दबाव वाढल्याचे चित्र दिसून आले.

आता लक्ष चौकशीकडे

तुर्भे वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प हा कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीशी संबंधित असल्याने या आरोपांना राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंत्राटदार किंवा कंपनी यांच्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक अथवा वैयक्तिक लाभाचा व्यवहार झाला आहे का, याची सत्यता चौकशीतून समोर यावी, अशी मागणी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

सागर नाईक यांचा कारवाईचा इशारा

दुसरीकडे, सागर नाईक यांनी सर्व आरोप फेटाळत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या प्रकरणात चौकशीचे पाऊल उचलते का, आरोपांमागे कोणते पुरावे सादर केले जातात आणि या राजकीय संघर्षाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT