Jayant Patil-Silver Oak Attack
Jayant Patil-Silver Oak Attack Sarkarnama
कोकण

धाडसत्रांना घाबरत नसल्यानेच अस्वस्थ झालेल्यांनी पवारांच्या घरावर हल्ला घडवून आणला

सरकारनामा ब्यूरो

रायगड : धाडसत्रांना राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) घाबरत नाही; म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला घडवून आणला आहे, असा आरोप नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. (NCP Jayant Patil accuses BJP of Silver Oak attack case)

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात आलेल्या प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आज (ता. ११ एप्रिल) उरण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत ते बोलत होते. जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, काही लोकांनी एसटी कामगारांना भडकाविण्याचा प्रयत्न केला आहे. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे देण्यात आली. त्यातूनच हे प्रकरण घडले आहे. आता अटक झालेल्या लोकांचीही चौकशी सुरू आहे, त्यातून दूध का दूध पानी का पानी होणारच आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी या वेळी बोलताना केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानावर एसटीच्या कामगार आंदोलकांनी हल्ला केला होता. त्याची राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणी एसटी कामगारांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबत ११० आंदोलक कामगारांनाही अटक केली असून ते सध्या न्यायालयानी कोठडीत आहेत.

या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले ॲड. सदावर्ते यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांनी तर यामागे नागपूरची ‘रेशीम बाग’ असल्याचे म्हटलेले आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. जातीयवादी पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच उत्तर देऊ शकतो, हे लोकांना आता पटले आहे, असे जयंत पाटील म्हणाले. प्रत्येक दिवशी काही चांगले करण्याची संधी मिळत असते. त्यामुळे निराश व्हायचं नाही. संघर्ष करावा लागतो, मात्र त्या संघर्षानंतर विजय आपलाच असतो. म्हणून खचून जाऊ नका, असा सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT