Rajendra Gavit Sarkarnama
कोकण

Palghar Lok Sabha Constituency: पालघर मतदारसंघासाठी तीन वेळा पक्ष बदललेले राजेंद्र गावित पुन्हा मैदानात उतरणार ?

Lok Sabha Election 2024 : राजेंद्र गावित आदिवासी समाजातून आलेले आणि राजकारणात आपले स्थान मजबूत करणारे एक मुत्सदी राजकारणी म्हणून ओळखले जातात.

Anand Surwase

Lok Sabha Election 2024 : राजेंद्र गावित आदिवासी समाजातून आलेले आणि राजकारणात आपले स्थान मजबूत करणारे एक मुत्सदी राजकारणी म्हणून ओळखले जातात. पालघर जिल्ह्याच्या विभाजनामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. ते पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. या खासदारकी संदर्भात त्यांच्या राजकीय प्रवासाचीही एक रंजक कथा आहे. पालघर या एकाच लोकसभा मतदारसंघासाठी गावित यांनी तब्बल तीन राजकीय पक्ष बदलल्याचा इतिहास आहे. एवढेच नाही तर एका रात्रीत पक्ष बदलणारा नेता म्हणून मतदारसंघात त्यांच्याबद्दल चर्चाही असते. (Palghar Lok Sabha Constituency) Lok Sabha Election 2024

राजेंद्र गावित हे मूळचे काँग्रेस पक्षातील राजकारणी आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते राज्याच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. त्यानंतर 2018 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागल्यावर त्यांना भाजपने पक्षात घेतले. त्यावेळी शिवसेना -भाजपने आपापले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजेंद्र गावितांनी श्रीनिवास वनगा यांचा पराभव करून लोकसभेचे सदस्यत्व मिळवले. पुढे सात महिन्यांतच 17 व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळी पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली.

त्यावेळी देखील राजेंद्र गावित यांनी थेट शिवसेना पक्षश्रेष्ठींचे निवासस्थान मातोश्री गाठले आणि शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळवली. 2019 च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांना एकूण 5 लाख 15 हजार मते मिळाली होती, तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 4 लाख 91 हजार 596 मते मिळाली होती. गावित यांचा 23 हजार 404 मतांनी विजय झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गावित हे सज्ज झाले आहेत. मात्र यावेळी राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर गावितांनी सुरुवातीला ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेत शिंदे गटावर आगपाखड केली होती. मात्र पुन्हा एकदा त्यांनी काही दिवसांतच सत्तेचे वारे पाहून शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला आहे.

शिंदे गटाने राजेंद्र गावित हेच आमचे पालघरचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. मात्र जागावाटप झाले नसल्याचे सांगत भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाला सुटणार, यावर सर्वांचे लक्ष आहे, कारण मतदारसंघ कोणालाही सुटला तरी राजेंद्र गावित तिकीट देईल तो आपला पक्ष अशी भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

पालघर मतदारसंघामध्ये डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून यातील तीन मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. तर राष्ट्रवादी शिवसेना आणि माकप यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर या मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलली असून बहुजन विकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत निर्णायक भूमिकेत राहू शकते.

नाव (Name):

राजेंद्र धेड्या गावीत

जन्मतारीख (Birth Date):

24 जुलै 1967

शिक्षण (Education):

बीए

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background):

काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित हे मूळचे नंदूरबारचे आहेत. मात्र त्यांची राजकीय कर्मभूमी पालघर जिल्हा राहिली आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र गावितांच्या वडिलांचे नाव धेड्या गावित तर मातोश्रींचे नाव जयताबाई गावित असे आहे. गावित यांच्या पत्नीचे नाव उषाताई गावित असे असून त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. पुत्र रोहित हे राजकारणात सक्रीय आहेत. गावित कुटुंबीय हे राजकारणासह व्यवसायतही सक्रिय आहे. राजेंद्र गावित यांच्या पत्नी मीरा भाईंदर येथे गॅस सर्व्हिस एजन्सी चालवतात.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business):

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency):

पालघर

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation):

शिवसेना (शिंदे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey):

राजकारणात वारा कोणत्या दिशेला वाहतोय याचा अंदाज घेऊन सत्ताधारी पक्षात दाखल होणारे राजकारणी म्हणून राजेंद्र गावीत यांची ओळख निर्माण झाली आहे. राजेंद्र गावीत यांनी पालघर लोकसभा मतदासंघासाठी एकाच वर्षात तीन पक्ष बदलल्याची नोंद त्यांच्या नावावर आहे. इतकेच नाही तर रात्रीत पक्ष बदलणारा नेता म्हणून त्यांच्यावर उपरोधक टीकाही केली जाते. दरम्यान, राजेंद्र गावित यांची मूळ राजकीय जडणघडण ही डाव्या विचारसरणीतून झाली आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस पक्षातून सुरू झाला.

2009 मध्ये त्यांनी पालघर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गावितांनी शिवसेना-भाजप युतीच्या मनीषा निमकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांना त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास, कामगार, फलोद्यान विकास व पाणलोट लाभक्षेत्र विकास या विभागाचे राज्यमंत्रिपद बहाल केले होते. या संधीचे सोने करत गावित यांनी मतदारसंघ आणि जिल्ह्यात अनेक विकासकामे केली. त्यामुळे त्यांची पालघरमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली होती.

पुढे 2014 च्या निवडणुकीत गावित यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना एबी फॉर्म देण्यास नकार देत उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. त्यावेळी काँग्रेसने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. पुन्हा विधानसभा जाहीर झाल्यावर गावितांना उमेदवारी देण्यात आली. मात्र यावेळी गावितांना शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 2015 मध्ये दुर्दैवाने आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाले आणि 2016 ला पोटनिवडणूक लागली. मात्र याही निवडणुकीत राजेंद्र गावितांना अमित घोडा यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

सलग दोन पराभव झाल्यानंतर पुढे ते राजकीय विजनवासात गेले होते. 2018 मध्ये पालघरचे खासदार चिंतामन वनगा यांचे निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून सातत्याने अपमान होत असल्याने मी पक्ष सोडल्याचे खापर त्यांनी यावेळी फोडले. भाजपच्या तिकीटावर त्यावेळी ते निवडून आले आणि लोकसभेत गेले. मात्र सात ते आठ महिन्यांतच लोकसभेची मुदत संपली आणि 2019 ची निवडणूक जाहीर झाली.

या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यावेळी गावित यांनी एका रात्रीतून पक्ष बदलला आणि शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. याही निवडणुकीत ते विजयी झाले. यावेळी त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता शिवसेना फुटीनंतर ते शिंदे गटात दाखल झाले असून ते पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. मात्र इथेही उमेदवारी मिळेपर्यंत ते कोणत्या पक्षात राहतील, याबाबतचे आडाखे आताच बांधणे कठीण आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency):

राजेंद्र गावितांनी आपल्या मतदारसंघात बरीच विकासकामे केली आहेत. आदिवासी विकास मंत्री असताना त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गावितांनी मतदारसंघात केळवे, माहीम, शिरगांव, सातपाटी, बोर्डी आदी पर्यटनस्थळांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. जिल्ह्यातील वाड्या-पाड्यांवर वीज पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. गाव पाड्यांवर पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. महिलांसाठी बचतगटांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्य करणे, मच्छिमांराना लहान बंदरे, ग्रामीण भागात शौचालये, रस्ते, वीज, पाणी यासाठी त्यांनी आपला निधी खर्च केला आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election):

राजेंद्र गावित यांनी शिवसेनेकडून ही निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांना 5,15,000, तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 4,91,596 मते मिळाली होती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election):

2019 च्या निवडणुकीत पालघर मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला होता. तत्पूर्वी, राजेंद्र गावित हे भाजपकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. या सात महिन्यांत त्यांनी विकासकामांचा धडाका लावला होता. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. शिवाय जरी ते भाजप सोडून शिवसेनेत गेले असले तरी त्या निवडणुकीवेळी शिवसेना- भाजप युती होती. त्याचाही फायदा गावित यांना मिळाला. भाजपने गावित यांच्या प्रचारासाठी जोर लावला कारण त्यांना मोदींची ताकद वाढवायची होती.

या शिवाय या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवार नव्हता. बहुजन विकास आघाडीने जाधव यांना संधी दिली होती आणि काँग्रेस -राष्ट्रवादीने त्यांना पाठिबा दिला होता. मात्र, त्याचा फारसा फायदा जाधव यांना झाला नाही. या निवडणुकीत शिवसेना, भाजपसह रिपाइं, श्रमजीवी संघटना या देखील युतीमध्ये सहभागी झाल्या होत्या, त्याचा फायदाही गावित यांना झाला. गावित हे युतीचे उमेदवार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा प्रभाव ओसरला नव्हता. त्यातच मोदी सरकारने पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन जनतेत आपली प्रतिमा तयार केली होती. त्याचाही फायदा गावितांच्या विजयासाठी झाला होता.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency):

राजेंद्र गावित यांचा पालघर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांतील जनसपर्क प्रभावी आहे. खासदार होण्यापूर्वी गावित हे पालघर मतदारसंघाचे आमदार होते. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणून काम करत असताना येथील आदिवासीच्या समस्या सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिले होते.

त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात त्यांचा प्रभावी जनसंपर्क आहे. याशिवाय राज्यमंत्री, आमदार आणि खासदार म्हणून काम करत असताना गावितांनी या मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. त्याच्या माध्यमातून ते जनतेशी जोडले जातात. आदिवासींचे विविध प्रश्न, समस्या यासाठी मोर्चे, आंदोलने असल्यास ते त्यात सहभागी होतात. त्यामुळे जनतेशी त्यांची नाळ घट्ट झाली आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles):

राजेंद्र गावित सोशल मीडियाचा वापर मर्यादित करताना दिसून येतात. राजेंद्र गावित हे स्वत: सोशल मीडियावर फारसे सक्रिय दिसून येत नाहीत. त्यांच्या सोशल मीडिया टीमकडून त्यांचे फेसबूक पेज चालवले जाते. त्या माध्यमातून गावित यांच्या कामांची, दौऱ्याची माहिती शेअर केली जाते. अन्य सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवरही गावित सक्रिय दिसून येत नाहीत.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate):

राजेंद्र गावित हे संयमी, मात्र मुत्सदी राजकारणी म्हणून ओळखले जातात. पक्ष बदलण्याच्या भूमिकेमुळेच राजेंद्र गावित जास्त चर्तेत आले होते. मात्र गावित यांनी राजकारणात सनसनाटी निर्माण होईल, असे कोणतेही विधान केले नाही. आदिवासींच्या प्रश्नांवर ते नेहमीच आपली भूमिका स्पष्ट करताना दिसून येतात. संसदेत बोलताना धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये असे विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी त्यांच्यावर राज्यातील धनगर समाजाच्या नेत्यांकडून टीका झाली होती. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी त्यांनी संसदेत केली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru):

------

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate):

राजेंद्र गावित यांचा पालघर जिल्ह्यातील राजकारणाचा अनुभव मोठा आहे. याशिवाय आदिवासी विकासमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. विद्यमान खासदार म्हणून देखील त्यांनी मतदारसंघात कामे केली आहेत. दुसरीकडे, आगामी निवडणुकीत राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील, असे शिंदे गटाने जाहीर केले आहे. भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. मात्र तो दावा करत असताना भाजपने गावित यांनाच उमेदवारी देण्याचा विचार केला असल्याची चर्चा सुरू आहे. गावित हे उमेदवारी मिळत असतील तर पक्ष बदलायला मागे पुढे पाहणार नाहीत, हा इतिहास आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate):

आदिवासी बहुल मतदारसंघांखेरीज चार-पाच वर्षांच्या कारकिर्दीत खासदार गावित हे लक्षात राहतील अशी विकासकामे करण्यात अपयशी ठरले. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत न राहता काहीशी अलिप्त भूमिका घेत आहेत. त्यामुळे पक्ष- संघटनेत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे संसदेत त्यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्य संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला असेल किंवा मच्छिमारांचे प्रश्न असतील, बेरोजगारी यासारख्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवला नसल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो.

या शिवाय केंद्र सरकारकडून एकही विकासाचा प्रकल्प जिल्ह्यात आणला नसल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे राजेंद्र गावितांची डाव्या विचारसरणीच्या संघटनाशी वाढलेली जवळीक यामुळे भाजपमध्येही त्यांच्याबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे. एका विकासकाचा चेक बाऊंस झाल्याप्रकरणातही गावित यांच्यावर टीका झाली होती.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences):

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. 2019 च्या निवडणुकीत ऐनवेळी राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती. आता यावेळी देखील शिंदे गटाने गावित हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढतील हे जाहीर करून टाकले आहे. मात्र युतीचे जागावाटप अद्याप झाले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो यावर येथील उमेदवार ठरणार आहे.

गावित यांचा इतिहास पाहता पक्ष कोणताही असला तरी युतीकडून गावित हेच उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते रात्रीतून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र यावेळी भाजप नेत्यांकडून गावित यांना विरोध होत आहे. त्यामुळे भाजपकडून या ठिकाणी माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा आणि आमदार विलास तरे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

मागील वेळी निवडणुकीत आघाडीने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता, यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात असून ठाकरे गटाचा यामध्ये समावेश आहे. ठाकरे गटाची या मतदारसंघात मजबूत पकड मानली जाते. त्यामुळे ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांच्या नावाची चर्चा आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT