Panvel FDA Raid Ahead of Diwali Sarkarnama
कोकण

FDA Raid : दिवाळीआधी FDA ची धडक कारवाई : कोट्यवधींचे चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स जप्त; लेबलिंगमध्ये दोष, दर्जाबाबत संशय

FDA Action in Raigad : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; आयात केलेले चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स आणि एनर्जी ड्रिंक्सचा समावेश

Aslam Shanedivan

Panvel News : दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता व ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे मोठी कारवाई केली आहे. 24 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी (M/s. Ajfan International Retails LLP) या आस्थापनातील 4 कोटी 21 लाख 6 हजार 961 रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्याने आणि त्यांचा दर्जा निकृष्ट असण्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आस्थापना प्लॉट क्रमांक 101 आणि 113, जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, कामोठे, पनवेल, जिल्हा रायगड येथे आहे. या ठिकाणी तपासणीदरम्यान श्री. कृष्णउन्नी ई. जी. मेनन (ॲडमिन मॅनेजर व व्हेंडर) यांच्याशी संबंधित आस्थापनातील अन्नसाठ्याची पाहणी करण्यात आली.

या कारवाईत मोठ्या प्रमाणावर आयात केलेले चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांसारख्या अन्नपदार्थांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये दोष असल्याचे तसेच काही अन्नपदार्थांचा दर्जा निकृष्ट असण्याची शक्यता असल्याने साठा जप्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई

या प्रकरणात अन्नपदार्थांच्या लेबलिंग आणि गुणवत्तेबाबत आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 23, 26 आणि 27 अंतर्गत तरतुदींच्या उल्लंघनाबाबत कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अन्नपदार्थांच्या बाबतीत पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

FDA च्या पथकाचा कारवाईत सहभाग

या कारवाईत मिलिंद महागडे, सहआयुक्त, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी पी. ए. भंडारकर यांच्यासह यू. एस. बडे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, कोकण विभाग), जी. एम. साबळे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, मुख्यालय), पावसकर, आढाव, इघारे, माने, गावडे आणि मुलानी यांनी सहभाग घेतला.

सहआयुक्त (दक्षता) प्रीती टिपरे आणि सहआयुक्त (कोकण विभाग), ठाणे येथील सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सणासुदीच्या काळात विशेष तपासणी मोहीम

दिवाळी आणि सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि लेबलिंगच्या नियमांचे पालन करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT