Dhule FDA Action: महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणाऱ्या गुजरात कनेक्शननंतर आता मिठाईसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट खवा आणि संशयास्पद दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करणारे रॅकेट समोर आले आहे. गुजरातमधून महाराष्ट्रातील मिठाई विक्रेत्यांना हा कच्चामाल पुरवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धुळे पोलिसांच्या मदतीने राष्ट्रीय महामार्गावर केलेल्या कारवाईत तब्बल 5,385 किलो संशयास्पद खवा आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून धुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनंतर अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या खासगी बसची तपासणी करण्यात आली. धुळे तालुक्यातील मोराणे येथे, प्रेम महामार्गावर हॉटेल बालाजीसमोर ही कारवाई करण्यात आली. एमपी 44 झेडए 7214 क्रमांकाच्या बसची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर खवा आणि दुग्धजन्य पदार्थ आढळून आले. हा माल मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणार असल्याचा संशय आहे.
कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने पॅक केलेला संशयास्पद खवा आढळून आला. त्यामध्ये ‘प्रीमियम हलवा’ आणि ‘स्वीट हलवा’ या नावाने असलेल्या पदार्थांचाही समावेश आहे.
एकूण 13 प्रकारचा तब्बल 5,385 किलो माल जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 16 लाख 52 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
जप्त करण्यात आलेला माल पुढील तपासणीसाठी गोदामात जमा करण्यात आला आहे. या पदार्थांची गुणवत्ता आणि त्यामध्ये नेमके कोणते घटक वापरण्यात आले आहेत, याची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे जगदीश मनाजी पाटीदार, महेंद्रसिंग पर्वतसिंग राठोड आणि बस क्लिनर राजकुमार रोशनलाल आचार्य अशी आहेत. तिघेही अहमदाबाद येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी धुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या मालाचा स्रोत, तो कोणाकडून पाठवण्यात आला आणि महाराष्ट्रातील कोणत्या व्यापाऱ्यांना त्याचा पुरवठा होणार होता, याचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्री आणि वाहतुकीवर बंदी असतानाही गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. धुळे आणि जळगाव परिसरातही गुटखा जप्तीच्या कारवाया झाल्या आहेत.
आता त्याच गुजरात कनेक्शनमधून मिठाई तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खवा आणि दुग्धजन्य पदार्थांचा संशयास्पद पुरवठा होत असल्याचे धुळ्यातील कारवाईतून समोर आले आहे.
हा माल केवळ धुळ्यापुरता मर्यादित आहे की महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही त्याचा पुरवठा केला जात होता, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा काळात कमी किमतीत उपलब्ध होणारा निकृष्ट किंवा बनावट कच्चा माल वापरला गेल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते.
त्यामुळे धुळ्यात पकडण्यात आलेल्या या मालाचा अंतिम गंतव्य कोणते होते आणि महाराष्ट्रातील कोणत्या मिठाई विक्रेत्यांपर्यंत तो पोहोचणार होता, याचा तपास आता महत्त्वाचा ठरतो.
FDAच्या तपासणीत या पदार्थांमध्ये नेमके काय आढळते आणि या रॅकेटची व्याप्ती किती आहे, यावर पुढील कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
गुजरातमधून निघालेला तब्बल 5.3 टन संशयास्पद खवा धुळ्यात पकडला गेल्याने मिठाईच्या कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.