Deepak Kesarkar
Deepak Kesarkar Sarkarnama
कोकण

भाजपत गेलेल्या गवस यांनी एकाच दिवसात ३६ लाखांची थकबाकी कशी भरली?

सरकारनामा ब्यूरो

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (Sindhudurg District Bank) संचालक प्रकाश गवस यांची संस्था ३६ लाख रुपये थकबाकीदार होती. ते पैसे एका दिवसात भरले गेले. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध संस्थांनी अडीच कोटी रुपयांची थकीत रक्कम भरली आहे. एवढी रक्कम आली कुठून, कोणी पैसे दिले, हा प्रश्न निर्माण होत आहे. अशाप्रकारे अडीच कोटी रुपये थकीत रक्कम कोणीतरी व्यक्तीने (स्वतःची सोडून...कारण एवढी रक्कम ते भरू शकत नाहीत) भरली असल्यास तो त्याचा फायदा घेणारच आहे, असे उत्तर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर दिले. (Prakash Gavas who joined BJP paid arrears of Rs 36 lakh in single day : Deepak Kesarkar)

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक महाविकास आघाडी कशाप्रकारे लढविणार आहे, याची माहिती देण्यासाठी महाआघाडीच्या नेत्यांनी शनिवारी (ता. ४ डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यात आमदार केसरकर यांनी वरील प्रश्न उपस्थित केला.

केसरकर म्हणाले की, निवडणुकीवेळी बोलेरो गाडी जिल्हा बँकेकडून घेऊ शकतात, ते लोक काही करू शकतात. वसंत केसरकर यांच्या नावानेसुद्धा बोलेरो गाडी घेतली होती. जिल्हावासीयांसाठी कसोटीचा काळ आहे. (कै.) शिवरामभाऊ जाधव यांनी ही बँक रुजविली आहे. त्यांच्यानंतर हा वारसा कोण चालविणार? असा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र सावंत यांनी ही जागा भरून काढली आहे. जनतेत जिल्हा बँक आपली असल्याची भावना त्यांनी निर्माण केली आहे. दबाव झुगारून जनतेला सोयीचे निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत मी सहकार निवडणूक प्रचारासाठी गेलो नव्हतो; परंतु यावेळी सावंत यांच्यासाठी प्रचार करणार आहे.

आपल्याकडे खूप पुरावे आहेत. केवळ त्यांनी बोलण्यास सुरुवात करण्याची, आरोप करण्याची वाट पाहत आहोत, असा इशारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी भाजपला दिला. जिल्हा बँक सातत्याने नाबार्डच्या ‘अ’ वर्गामध्ये राहिली आहे. एनपीए शून्य टक्के आहे. आम्हाला आता दूध उत्पादनात लक्ष घालवायचे असून एक लाख दूध उत्पादन विकसित करायचे असल्याचे सावंत यांनी सांगितले.

खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘‘पाच वर्षांतील मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी राजकीय दबाव आणत चुकीच्या पद्धतीने कोट्यवधीची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचा प्रयत्न केला; मात्र हा दबाव झुगारत सावंत यांनी शेतकरी हितासाठी निर्णय घेतला. बँकेत कोणताही घोटाळा होऊ दिला नाही. जिल्हा बँक निवडणूक विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेत जागावाटप निश्चित केले होते. त्यानुसार जिल्हा बँक निवडणूक लढविण्यात येत आहे.

या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदार पुन्हा सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व संचालक निवडून देतील, असा मला विश्वास आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांत जिल्हा बँकेची आर्थिक उलाढाल साडेतीन हजार कोटींवर जाईल. काही लोकांनी पक्षीय नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी आणलेला दबाव झुगारून सावंत यांनी बाणेदारपणा दाखविला. तसाच कारभार यापुढेही सावंत व त्यांचे संचालक निवडून आल्यानंतर करतील. ही बँक लुटारूंपासून वाचवतील," असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT