Raigad Guardian Minister Controversy; Uday Samant, bharat gogawale and Sunil Tatkare sarkarnama
कोकण

Bharat Gogawale : रायगडचा वाद संपला? गोगावलेच पालकमंत्री, 'आपली इच्छा' बोलून दाखवत उदय सामंतांनी तटकरेंना बैठकची आठवण करून दिली

Uday Samant On Raigad Guardian Minister Row : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व आमदार भरत गोगावले हे अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावी दरे येथे दाखल झाले. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Aslam Shanedivan

Raigad Politics : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेल्या रस्सीखेच दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भरत गोगावले यांना दिले आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. अशातच स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्ह्याचे ध्वजवंदन कोण करणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

या दरम्यान, एकीकडे गोगावले अचानक एकनाथ शिंदे यांच्या मूळ दरे गावी दाखल झाले. तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना त्या बैठकीची आठवण करून देत, गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत, अशी आपली इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. ते सांगलीत बोलत होते. यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरून घडामोडींना वेग आला असून, अंतिम निर्णयाकडे रायगडसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले यांनी आग्रही भूमिका घेतली असून, ते अनेकदा यावर भाष्य करताना दिसतात. नुकतेच त्यांनी याबाबत भाष्य करत संकेत दिले होते. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या आधी यावर निर्णय होईल आणि आपण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ, असा विश्वास व्यक्त केला होता.

मात्र, आता १५ ऑगस्टला फक्त सात-आठ दिवस बाकी असून, अद्याप यावर कोणताच निर्णय झालेला नाही. यावरून गोगावले हे शिंदे यांच्या मूळ दरे गावी गेल्याची चर्चा आहे. एकीकडे अशा चर्चा जोर धरत असतानाच, उदय सामंत यांनी यावर मोठे भाष्य केले आहे. त्यांनी याबाबत, पालकमंत्री कोण, याचा निर्णय तिन्ही पक्षांचे नेते घेतात. तेच तो ठरवतात, असे सांगितले.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचा नेता म्हणून माझी बैठक झाली होती. त्यावेळी तटकरे यांनी माझ्यासह गोगावले यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्या चर्चेप्रमाणे आता त्या गोष्टीला मूर्त स्वरूप यावे आणि गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत, ही माझ्यासह सर्वांचीच इच्छा असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वीच याच मुद्द्यावर गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याची चर्चा आहे. तसेच या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सोडवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून येत्या तीन ते चार दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. आता नेमका कोणता निर्णय होतो. याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT