रायगड जिल्हा परिषदेत निकाल लागून दहा दिवस उलटले तरी सत्ता स्थापन न झाल्याने त्रिशंकू स्थिती कायम आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यातील वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
सदस्य फुटण्याच्या भीतीने त्यांना गोव्यात हलवण्यात आल्याचा आरोप करत गोगावले यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
Raigad News : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले असून अद्याप रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यात आलेली नाही. येथे सत्तास्थापनेत त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याच पक्षाकडून सत्तास्थापनेसाठी ठोस भूमिका जाहीर झालेली नसून पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यातील वादामुळे हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे. यावरून गोगावले यांनी राष्ट्रवादी-भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे. त्यांनी सदस्य फुटायची भीती असल्यानेच सदस्यांना गोव्याला हलवलण्यात आल्याचा टोला लगावला आहे.
रायगडमधील जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी हालचालिंना वेग आला असून शिवसेनेला डावलून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्लॅन राष्ट्रवादीने केला होता. यावरूनच गोगावले यांनी आधीच गर्भीत इशारा देताना याचा परिणाम राज्यातील आगामी निवडणुकांवर होईल असे सांगत लोकसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांचा उल्लेख केला होता.
या इशाऱ्यानंतर आता भाजपकडून रायगडमधील सत्तास्थापनेचा विषय सावधपणे हाताळला जात आहे. येथे एकूण ५९ सदस्यसंख्या असून सत्तास्थापनेसाठी ३० सदस्यांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे १६ आणि भाजपचे १५ सदस्य निवडून आल्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र आल्यास सत्तास्थापन होऊ शकते. तर सर्वाधिक जागा या शिंदेंच्या शिवसेनेनं २१ जागा जिंकल्या असून त्यांना सत्ता स्थापनेसाठी ९ सदस्यांची गरज आहे. पण या सत्तेच्या समिकरणात सध्या तरी राष्ट्रवादी-भाजपचे पारडे जड दिसत आहे.
यादरम्यान रायगडमधील राजकारण आणखी तापले असून राज्यातील महायुती रायगडमध्ये तुटण्याची चिन्ह दिसत आहेत. याठिकाणी आरोप-प्रत्यारोप सुरूच झाले असून सदस्य फुटायची भीती असल्यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांना गोव्याला हलवले असल्याचा टोला मंत्री गोगावले यांनी लगावला आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रवादीला भीती आहे की आम्ही त्यांचे सदस्य फोडू. पण आम्ही आमचा एकही सदस्य कुठं हालवला आहे का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र दोन्ही पक्षांचे सदस्य त्यांनीच हालवले आहेत. त्यामुळे बघू पुढे काय होतं ते असेही गोगावले यांनी म्हटलं आहे.
यावेळी राष्ट्रवादी-भाजप युतीवर बोलताना गोगावले यांनी, 'आम्हाला सत्तेतपासून दूर ठेवण्यासाठी आता गणितं मांडली जात आहेत. त्यासाठी खेळी खेळी जात आहे. पण पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही येणार आहेत. त्यावेळी शिवसेनेची गरज लागेलच, तेव्हा आम्ही पाहू काय करायचं ते', असा इशाराच गोगावले यांनी मित्र पक्षांना दिला आहे. या इशारा थेट भाजप आणि राष्ट्रवादीलाच आहे.
1. रायगड जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती का निर्माण झाली आहे?
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेत अडथळे निर्माण झाले आहेत.
2. सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात वाद कशावरून आहे?
सत्ता स्थापनेसाठीच्या चर्चांवरून आणि संभाव्य आघाड्यांवरून दोघांमध्ये मतभेद वाढले आहेत.
3. सदस्यांना गोव्यात हलवण्यामागचे कारण काय सांगितले जाते?
सदस्य फुटू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
4. हॉटेल पॉलिटिक्स म्हणजे नेमके काय?
सत्तास्थापनेच्या काळात सदस्यांना एका ठिकाणी ठेवून राजकीय गणित जुळवण्याची पद्धत म्हणजे हॉटेल पॉलिटिक्स.
5. पुढील काही दिवसांत काय घडू शकते?
आघाड्यांच्या बैठका आणि चर्चांनंतर सत्ता समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.