रायगड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
भाजपला अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने उपाध्यक्षपद स्वीकारल्याचा सत्तेचा फॉर्म्युला चर्चेत आहे.
शिवसेना सर्वाधिक जागा जिंकूनही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
raigad zilla parishad politics : रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत कोण बसणार, याचे गूढ शेवटच्या क्षणापर्यंत कायम आहे. शिवसेनेचे दबावतंत्र कामी येणार, की भाजप-राष्ट्रवादीची राजकीय मुत्सद्देगीरीला यश येणार यासंदर्भात अनेक तर्कवितर्क मागील महिनाभरापासून लढवले जात आहेत. याचे कोडे उद्या गुरुवारी (ता. १२) अलिबागमध्ये सुटणार असून विशेष सभेत सत्ता स्थापनेचा हायहोल्टेड ड्रामा पाहावयास मिळणार आहे. सत्तास्थापनेसाठी भाजप-राष्ट्रवादीत पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. तर सर्वाधिक जागा जिंकणारी शिवसेना सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. यावरून वरवर शांत दिसणारे राजकीय वातावरण आतमधून तितकेच तापलेल्याची चर्चा आहे.
दरम्यान फक्त शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या आमदारांना धडा शिकवण्याठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचे बोलले जात आहे. तर जिल्हा परिषदेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरवताना तटकरेंनी मोठी खेळी करत पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेण्यासाठी सेटलमेंट केल्याची चर्चा आहे. याच सेटलमेंटचा भाग हा भाजपला अध्यक्षपद सोडण्यात आले असून राष्ट्रवादीने उपाध्यक्ष पदावर समाधान मानले आहे.
रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक आता संवेदनशील स्थिती आली असून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात तटकरेंना यश येताना दिसत आहे. पण भाजपला सोबत घेवून राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यात किती यश येईल हे उद्याच्या सभेत स्पष्ट होणार आहे. एकीकडे रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेचा फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप प्रदेषाध्यक्षांच्या बैठकीत ठरला जात असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करावी म्हणून शिवसेनेकडून प्रयत्न केले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील महायुतीबाबतचा चेंडू त्यांच्या कोर्टात गेला आहे. ते काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यासह कोकणाचे लक्ष लागले आहे. तसेच येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती झाल्यास रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळण्याचे संकेत आहेत. असे झाल्यास तटकरे विरुद्ध गोगावले आणि शिवसेनेचे आमदार असा वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी लागल्यानंतर भाजप-राष्ट्रवादीने आपले विजयी सदस्य गोवा पर्यटनाला पाठवले आहेत. हे सदस्य देखील आज (बुधवारी ता. ११) रोजी अलिबागमध्ये दाखल होणार असून त्यांना हॉटेल रविकिरण येथे तर दुसरीकडे दिग्गज नेते पंचतारांकित हॉटेल 'ताज' (रेडिसन ब्ल्यू) थांबतील.
भाजपला प्रथमच अध्यक्षपद
जिल्हा परिषदेचे ३४ सदस्य एकत्र असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-१६, भाजप-१५, उबाठा-५ यांचा समावेश आहे. त्यामुळे ५९ सदस्य संख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली बहुमताचा आकडा जमवल्याचे सांगितले जात आहे. रायगड जिल्हा परिषदेत भाजप पहिल्यांदाच सत्तेत येत असून, भाजपचेच वैकुंठ पाटील यांची अध्यक्षपदी निवड होईल, अशी माहिती समोर आली आहे. सर्वाधिक २१ जागा असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. दरम्यान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आवश्यक असणारी ३१ ही मॅजीक फिगर आम्ही निश्चितपणे गाठली असून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष व उपाध्यक्ष होईल. या निवडीत कोणतीही अडणच नसल्याचे भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. महेष मोहिते यांनी स्पष्ट केले आहे.
वादाचे कारण
रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना यांच्यात जिल्ह्यात तीव्र आणि विकोपाला गेलेला संघर्ष आहे. राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात मोठी रस्सीखेच सुरु आहे. पालकमंत्रीपदाच्या राजकीय वादाच्या निमित्ताने, शिवसेना आमदार व मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र दळवी यांनी सातत्याने राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिंदे शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला आणि रायगडचे पालकंमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची चर्चेत आहे.
सभापती आणि उपसभापती निवड
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ११ मार्च रोजी पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले असून, त्या सभांमधून सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तास्थापनेची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.
1. रायगड जिल्हा परिषदेत सत्तेसाठी कोणते पक्ष प्रयत्न करत आहेत?
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन प्रमुख पक्षांमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत.
2. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कोणता फॉर्म्युला चर्चेत आहे?
भाजपला अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देण्याचा सत्तेचा फॉर्म्युला चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.
3. शिवसेनेची भूमिका काय आहे?
सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसते.
4. सुनील तटकरे यांच्या भूमिकेबद्दल काय चर्चा आहे?
सुनील तटकरे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
5. पालकमंत्रीपदाबाबत काय बोलले जात आहे?
सत्तेचा फॉर्म्युला ठरवताना पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या पदरात पडावे यासाठी सेटलमेंट झाल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.