Water Department Corruption Case; BJP corporator Pratik Bandekar Sarkarnama
कोकण

BJP Corporator Resigns : भाजप नेत्याचा सभापतीपदाचा राजीनामा; शिंदेंच्या शिवसेनेनं बांदेकरांची विकेट काढली

Sawantwadi Water Department Corruption : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित घोटाळ्यावरून जोरदार गदारोळ झाला होता.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित अपहारावरून विरोधकांनी सभात्याग करत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बांदेकर यांनीच याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला धक्का बसला असून, शिंदेंच्या शिवसेनेने भाजपविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील मित्रपक्षांमधील संघर्ष पाहायला मिळाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित घोटाळ्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. या कथित घोटाळ्यावरून नगरपरिषदेच्या मासिक सभेतही जोरदार गदारोळ झाला. शिवसेनेचे नगरसेवक संजू परब यांनी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती.

त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग करत नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. पाणीपुरवठा विभागातील जोडारी कर्मचारी भारत लाखे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाखे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत परब यांनी बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

परब यांनी लाखे यांच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर सभापतींच्या राजीनाम्याचे काय झाले, अशी विचारणा केली. राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही सभागृहात बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी सभागृहात मोठा गोंधळ उडाला. मात्र, नगराध्यक्षांनी हा विषय आता घ्यायचा नाही, असे सांगताच शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला आणि नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्यान, बांदेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच आपण आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्याकडे सादर केल्याचे जाहीर केले. पाणीपुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचारावरून आपल्यावर होत असलेले चुकीचे आरोप आणि त्यामुळे आपल्या प्रतिमेला लागणारे डाग लक्षात घेऊन राजीनामा दिल्याचे त्यांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सांगितले. तसेच, नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागात काम करत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“यापुढे सभात्यागाचा असा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.”

— श्रद्धा भोसले, नगराध्यक्षा

“हा सभात्याग कायद्याला धरून नाही. त्यामुळे सभागृहाचा अवमान केलेल्या सर्व नगरसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाने करावी.”

— ॲड. अनिल निरवडेकर, उपनगराध्यक्ष

“पालिकेच्या इतिहासात असा भ्रष्टाचार आम्ही कधीच पाहिला नाही. सर्वच विभागांत भ्रष्टाचार वाढला आहे.”

— संजू परब, शिवसेना (शिंदे गट)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT