Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खळबळजनक प्रकार घडला असून, आता त्याची चर्चा जोरदार होताना दिसत आहे. ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापालिकेच्या अखत्यारितील स्मशानभूमींमधील विद्युत दाहिन्या वारंवार बंद पडत असल्याच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. तसेच संबंधित ठेकेदाराला थेट “त्या विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार” अशी धमकी दिली आहे. या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अशा भाषेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बुधवारी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापालिकेच्या अखत्यारितील स्मशानभूमींचा मुद्दा उपस्थित केला. विद्युत दाहिन्या वारंवार बंद पडत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासनाला जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
या दाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगत, त्यांनी या परिस्थितीत सुधारणा का होत नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच वारंवार सांगूनही यात सुधारणा होत नसल्याचा आरोप केला.
याच मुद्द्यावरून प्रशासनाला चांगलंच धारेवर धरताना त्यांचा पारा चांगलाच चढला. तर यापुढे या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार नाही, असे ठणकावत त्यांनी प्रशासनाने संबंधित ठेकेदारांची नावं जाहीर करावीत, असे म्हणत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.
आता दुरुस्तीचे काम करूनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर त्या ठेकेदाराविरोधात कठोर भूमिका घेऊ, असा इशारा दिला. तर त्या ठेकेदारांनी सुधारणा केली नाही, तर मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार, असे धक्कादायक वक्तव्य केलं. विशेष म्हणजे, यावेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते. तर त्यांच्या या वक्तव्यावर स्वकीयांनीही दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
मात्र, मोरे यांच्या या विधानाची सभागृहाबाहेर जोरदार चर्चा होताना दिसत असून, राजकीय लोकप्रतिनिधींच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर विकासकामांबाबत लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असताना, एखाद्या व्यक्तीला जिवंत जाळण्याची भाषा करणे योग्य आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.