Sindhudurg News : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित घोटाळ्यावरून झालेल्या राजकीय संघर्षानंतर भाजपचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा परब यांनी भाजपला डिवचले असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये युतीबाबत अपवादात्मक परिस्थितीतच विचार केला जाईल, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
वेंगुर्ले येथे शिवसेनेच्या शाखेत तालुका शिवसेनेची मासिक सभा जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परब यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. वेंगुर्ले तालुक्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत युती केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, एखाद्या गावात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सहमती असेल, तर अपवादात्मक परिस्थितीत युतीबाबत विचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पक्षाची संपूर्ण ताकद लावली जाईल. या कामात कुठेही कमी पडणार नाही, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. आपण आता तालुक्यात विशेष लक्ष घालणार असून, गावागावांतील शिवसैनिकांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच युवासेनेने प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची फळी तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सावंतवाडीत राजकीय संघर्ष
सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित घोटाळ्यावरून शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. या प्रकरणाचे पडसाद नगरपरिषदेच्या मासिक सभेतही उमटले. शिवसेनेचे नगरसेवक संजू परब यांनी भाजपचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीवरून परब यांनी आक्रमक भूमिका घेत नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. सभापतींचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृहात बसणार नसल्याची भूमिका परब यांनी घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. अखेर प्रतीक बांदेकर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्याकडे सादर केल्याची माहिती दिली.
बांदेकरांची भूमिका
पाणीपुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचारावरून आपल्यावर चुकीचे आरोप केले जात असल्याचे बांदेकर यांनी म्हटले होते. या आरोपांमुळे आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याने आपण सभापतीपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागातील कामे सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात ‘दोस्तानेच दोस्ताची विकेट काढली’ अशी चर्चा रंगली होती. आता संजू परब यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमधील युतीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेतील राजकीय समीकरणांवर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
शिवसेनेची तालुका कार्यकारिणी जाहीर
दरम्यान, काही कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आलेली शिवसेनेची तालुका कार्यकारिणी पुन्हा गठित करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये उपतालुकाप्रमुखपदी शिरोडा येथील कौशिक परब, मठ येथील उमेश नाईक, आसोली येथील संजय गावडे आणि चिपी येथील भिकाजी ऊर्फ तात्या पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
विभागप्रमुखपदी म्हापण येथील दत्ता साळगावकर, रेडी येथील सुनील सादजी, तुळस येथील संजय परब, आडेलो येथील मितेश परब आणि उभादांडा येथील शैलेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली. उपविभागप्रमुखपदी रेडी येथील रवी पेडणेकर, शिरोडा येथील शंकर कुडव, तुळस येथील रवींद्र केळुसकर आणि उभादांडा येथील नरेंद्र मोंडकर यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारिणी सदस्यपदी शिरोडा येथील अमित गावडे यांची नियुक्ती करण्यात आली.
राजकीय समीकरणे बदलणार?
सावंतवाडी नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाच्या कथित घोटाळ्यावरून सुरू झालेला संघर्ष आणि त्यानंतर प्रतीक बांदेकर यांनी दिलेला राजीनामा या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी युतीबाबत घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. आता भाजपकडून या भूमिकेला काय प्रतिसाद दिला जातो आणि आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची रणनीती काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.