Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत सध्या महिला सक्षमीकरणाचे आगळेवेगळे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अपर पोलिस अधीक्षक अशा जिल्हा प्रशासनातील पाच महत्त्वाच्या पदांची धुरा सध्या महिला अधिकाऱ्यांकडे आहे. निर्णयक्षमता, संवेदनशीलता आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या जोरावर या अधिकारी जिल्ह्याच्या प्रशासनात आपली ठळक छाप उमटवत आहेत. जिल्ह्याच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे कार्यरत आहेत.
महसूल प्रशासन, निवडणूक प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, विकासकामांचा आढावा यासह जिल्हास्तरीय विविध यंत्रणांच्या समन्वयाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे महसूल प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभाराची धुरा आजपासून मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांच्याकडे आली आहे. काल (ता.७) त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बालविकासासह विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
जिल्हा परिषदेतच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड याही महत्त्वाची प्रशासकीय भूमिका बजावत आहेत. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रातही महिला नेतृत्व ठळक झाले असून, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम या जिल्हा पोलिस दलातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. गुन्हे नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था तसेच विविध बंदोबस्तांच्या नियोजनात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
एकाच वेळी जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद आणि पोलिस प्रशासनातील एवढ्या महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी कार्यरत असणे हा दुर्मीळ योग मानला जात आहे. प्रशासनातील पारंपरिक पुरुषप्रधान प्रतिमेला मागे टाकत महिला अधिकारी सक्षमपणे निर्णय घेत असून, विकास, लोकाभिमुख प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेत आपले नेतृत्व सिद्ध करीत आहेत.
महिलांनी केवळ प्रशासकीय सेवेत प्रवेश केला नाही, तर जिल्ह्याच्या धोरणात्मक आणि निर्णयप्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पदे समर्थपणे सांभाळण्यापर्यंत मजल मारली आहे. सिंधुदुर्गातील सध्याची ही प्रशासकीय रचना त्यामुळे महिला सक्षमीकरणाचा केवळ संदेश देणारी नसून प्रत्यक्ष कृतीतून नेतृत्व सिद्ध करणारी ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.