कोकणासह राज्यातील अनेक भागात मतदानादरम्यान राडा, हाणामारी आणि शाब्दिक चकमकी घडल्या.
पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली; मात्र रायगड आणि सिंधुदुर्ग येथे भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर FIR दाखल झाली.
या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केली.
Raigad and Sindhudurg News : कोकणासह राज्यात अखेर रखडलेल्या 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचे मतदान प्रतिक्रिया पार पडली. पण आयोगानं 20 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकल्याने आता एकत्रित 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान कोकणासह राज्याच्या विविध भागात मतदानादरम्यान जोरदार राडा, हाणामारी, बाचाबाची तसेच शाब्दीक चकमक झाल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर वाद निवळला. पण कोकणात मात्र वाद निवळला नसून रायगडसह तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राडा करणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण झाला आहे. मंगळवारी मतदान प्रक्रियेदरम्यान तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अनेक ठिकाणी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. बोगस मतदान बुथवरच पैसे वाटपासह पोलिसांची निष्क्रियेतेच्या आरोपांमुळे येथे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
महाडच्या नवा नगर परिसरात शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादीमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला होता. सुशांत जावरे आणि विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादामुळे हा संघर्ष उफाळून आला होता. गोगावले यांच्या गटाने आपल्या समर्थकांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप जावरे यांनी केला. तर जावरे यांच्या अंगरक्षकाने पिस्टल दाखवत अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गोगावलेंच्या समर्थकांनी केला होता. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
या घटनेनंतर आता आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्यांची तोडफोड आणि मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महाडमधील या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
त्याचपद्धतीने सावंतवाडीतील मालवणमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे सापडल्याने वाद सुरू झाला होता. यावेळी आमदार निलेश राणेंनी पोलिस ठाण्यात जावून भाजपच्या नेत्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी केली होती. यानंतर मंगळवारी मतदाना वेळीही भाजपच्या पदाधिकाऱ्याने पहिल्यांदा बूथवर गाडी जाताना गाडी अडवून विशाल परब यांच्या ताफ्यातील चालकाला मारहाण केली होती. यावरून येथील वातावरण चांगलेच तापले होते. तसेच पोलीस ठाण्यातच भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता.
यासर्व घटनेनंतर आता गाडी अडवणे, धमकी देणे, मारहाण करणे, जमाव करणे अशा प्रकारचे गुन्हे शिवसेना पदाधिकाऱ्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर दाखल करण्यात आले आहे. या फिर्यादीनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता कविटकर- सावंत, राकेश परब, अजय गोंदावळे यासह पदाधिकारी आणी कार्यकर्ते अशा 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
तर शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते पाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गर्दी करणे मारामारी करणे आणि अंगावर धावून जाणे अशा प्रकारचे गुन्हे भाजपच्या 20 ते 25 जणांवर दाखल करण्यात आले आहेत. ज्यात भाजपचे विनोद चव्हाण, अॅड.अनिल निरवडेकर यांच्यासह त्याच्या ड्रायव्हरचा समावेश आहे. अशाप्रकारे सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने कोकणाच्या शांततेला डाग लागला आहे. तर महायुतीतील या तिन्ही पक्षांमधील संघर्षामुळे तणाव आणखी निर्माण झाला आहे.
गद्दारांचा बुडबुडा फुटला
सध्या राजकारणातील स्थिती पाहून घाणेरडापणा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यातलेच लोक (निलेश राणे) त्यांच्या पैशाच्या बॅगा शोधून देत आहेत. ज्यांनी पैसे शोधून दिली आहे त्यांच्याच घरावर धाडी टाकण्याचे काम सुरू आहे. राज्यात सध्या झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा बुरखा फाटला आहे. भाजप असो शिवसेना किंवा राष्ट्रवादी पक्षात आता हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत. पैशाची उधळपट्टी सुरू आहे. हेलिकॉप्टरमधून काय साहित्य नेत आहेत यावर हे पाहून त्यांचेच लोक त्यांच्यावर धाडी टाकत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली आहे.
FAQs :
1. मतदानादरम्यान राडा कुठे झाला?
रायगड, सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर भागांत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला.
2. पोलिसांनी काय कारवाई केली?
पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद शांत केले आणि संबंधितांवर गुन्हे दाखल केले.
3. FIR कोणावर नोंद झाली?
भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांवर FIR नोंद झाली.
4. उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी शिंदे यांचे नाव न घेता सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.
5. या प्रकारांचा मतदानावर कसा परिणाम झाला?
काही ठिकाणी तणाव वाढला, परंतु एकूण मतदान प्रक्रिया सुरू राहिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.