Ulhasnagar News : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून आगरी कोळी समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या भवनाच्या बांधकामावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मंजूर आराखड्यानुसार नियोजित जागेवर बांधकाम करणे अपेक्षित असताना, ठेकेदाराने दुसऱ्याच जागेवर पायाभरणी करून प्रत्यक्ष काम सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे, बांधकाम सुरू होऊनही महापालिकेच्या नगरविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख परशुराम पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ मधील दुर्गादेवी पाडा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आगरी कोळी समाज भवनासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, मंजूर नकाशानुसार आणि निश्चित केलेल्या जागेवर बांधकाम करण्याऐवजी ठेकेदाराने दुसऱ्याच ठिकाणी पायाभरणी करून कामाला सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे, तर मंजूर आराखड्यातील क्षेत्रफळातही बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. शासकीय कामाचे अधिकृत भूमिपूजन होण्यापूर्वीच बांधकाम सुरू करण्यात आल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच परशुराम पाटील यांनी महापौर, महापालिका आयुक्त आणि संबंधित अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर आमदार बालाजी किणीकर यांनी बांधकामस्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच मंजूर नकाशाप्रमाणे नियोजित जागेवरच आगरी कोळी समाज भवनाचे बांधकाम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
दरम्यान, मंजूर जागेत बदल करण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला? संबंधित विभागांची परवानगी घेतली होती का? तसेच नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची माहिती का नव्हती? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. पाच कोटी रुपयांच्या विकासकामात अशा प्रकारे जागा आणि आराखड्यात बदल होत असल्याने उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासकीय समन्वयावर आणि कामकाजाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.