

नवनीत बऱ्हाटे
Ulhasnagar News : उल्हासनगर शहरातील स्वच्छतेला आता विकासनिधीचे बळ मिळणार आहे. शहरातील ज्या प्रभागात स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन उत्कृष्ट असेल, त्या प्रभागाला तब्बल १० कोटी रुपयांचा विशेष विकासनिधी देण्याचे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले. त्यामुळे नगरसेवकांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा रंगणार असून प्रभागांच्या विकासाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
उल्हासनगर शहरातील अस्वच्छतेचे चित्र बदलण्यासाठी आणि प्रभागांच्या विकासाला गती देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने विशेष स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत शहरातील सार्वजनिक आरोग्य, दैनंदिन साफसफाई आणि कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागाला तब्बल १० कोटी रुपयांचा विशेष विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापौर ॲड. अश्विनी कमलेश निकम यांनी सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून स्वच्छतेच्या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रभागातील रस्ते, सार्वजनिक परिसर आणि शौचालयांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आरोग्य सुविधांची उपलब्धता तसेच प्रभावी कचरा व्यवस्थापनावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून हे अभियान राबविण्याबरोबरच प्रभागातील स्वच्छतेच्या समस्या आणि आवश्यक सुविधांची माहिती आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता १० कोटींच्या विकासनिधीवर कोणता प्रभाग बाजी मारणार आणि कोणते नगरसेवक स्वच्छतेत सरस ठरणार, याकडे उल्हासनगरकरांचे लक्ष लागले आहे.
महापौर ॲड. अश्विनी निकम म्हणाल्या की, “उल्हासनगर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनविणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट स्वच्छता राखणाऱ्या प्रभागाला १० कोटींचा विशेष विकासनिधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून नागरिकांच्या सहभागातून आपला प्रभाग आदर्श बनवावा. स्वच्छतेसोबतच शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा आमचा संकल्प आहे.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.