Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: मित्रपक्षांच्या आग्रहाला भाजप धूप घालणार का?

Lok Sabha Election News : अजित पवार गटाने नाशिक, मावळ, रायगड, बारामती, शिरूर, बुलडाणा आणि महादेव जानकरांसाठी परभणीच्या जागेची मागणी केली आहे, तर मुख्यमंत्री शिंदेंने त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व खासदारांसाठी उमेदवारी मागितली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आपल्याला फायदा व्हावा म्हणून भाजपने महायुती केली, परंतु कोणत्या जागा कोणाला द्यायच्या यावरून युतीतील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तर नरेंद्र मोदींची (Narendra Modi) लोकप्रियता लक्षात घेता महाराष्ट्रात किमान दोन तृतीयांश म्हणजे 32 जागा लढावाव्यात, असा निष्कर्ष पाहणीतून पुढे आला आहे. परंतु, युतीतील शिंदेंच्या शिवसेनेची 15 जागा लढण्याची भूमिका आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 7 जागांवर दावा केल्यामुळे भाजपची (BJP) चांगलीच कोंडी झाली आहे.

आजपर्यंत राज्यात शिवसेना (Shivsena) किमान 23 लोकसभा मतदारसंघ लढवते. अशातच सेनेला 10 किंवा 13 जागांवर लढावे लागले, तर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सहानुभूती वाढू शकते, असा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केलाआहे, तर अजित पवार गटाने आपणाला केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित राहायचे नाही. त्यामुळे त्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील काही जागांची मागणी केली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काल मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Devendra Fadnavis and Ajit Pawar) यांच्या बैठकीत काही जागांवर युतीतील तिन्ही पक्षांनी दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, नाशिक (Nashik) मतदारसंघातील सध्याचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) निवडून येणार नाहीत, असे सांगत अजित पवार गटाने या जागेवर दावा केला. शिवाय त्यांनी बुलडाणा (Buldhana) मतदारसंघीचीही मागणी केली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी आता अजित पवारांसोबत असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता, तर गडचिरोलीच्या जागेवर भाजपने खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धर्मरावबाबांना संधी नाही, त्यामुळे बुलडाणा सोडा, अशी मागणी केली आहे.

अजित पवार गटाने नाशिक, मावळ, रायगड, बारामती, शिरूर, बुलडाणा आणि महादेव जानकरांसाठी (Mahadev Jankar) परभणी अशी मागणी केली आहे. लक्षद्वीपची जागा मिळाली असली तरी ती राज्यातील नाही, असा युक्तिवादही राष्ट्रवादीने केला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व खासदारांसाठी उमेदवारी मागितली असून, औरंगाबाद आणि ठाण्याची जागाही आम्हाला द्यावी, अशी मागणी दिल्लीतील वरिष्ठांकडे केली आहे. तसेच मागील निवडणुकीत लढवलेले सगळेच मतदारसंघ आम्हाला द्या, अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने रामटेक मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवण्यास तयार असलेल्या काँग्रेसच्या राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश करत ती जागा शिंदेंना दिली, तर भाजपने जवळपास सर्व खासदारांना पुन्हा उमेदवारीची संधी दिल्याने शिंदे गटातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासह सदाशिव लोखंडे आणि संजय मंडलिक यांनाही आमची उमेदवारी निश्चित असल्याचं सांगायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, रामटेकमधून कृपाल तुमाने यांनी माघार घेतली, तर भावना गवळी (Bhavna Gawli) शांत आहेत. गजानन कीर्तिकर खासदार असलेल्या मुंबईच्या जागेवर अद्याप चर्चाही सुरू झालेली नाही. नाशिकच्या जागेवरून युतीतील वाद सर्वश्रुत आहे, तर तिकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपने दावा केल्यामुळे वादातील जागा तशाच ठेवत भाजपने 23 उमेदवार घोषित केले. दरम्यान, मुंबईत 4 जागा लढवल्या तरी 27 म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा केवळ दोन जागा जास्त होतील; मग शिवसेना फुटल्याचा फायदा काय? असा प्रश्न भाजपमध्ये चर्चेत आला आहे, तर जागावाटपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT