devendra fadnavis eknath shinde sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : "भाजपनं मैत्री जपली पाहिजे अन्...", शिंदे गटातील नेत्यानं सुनावलं

Akshay Sabale

लोकसभेच्या ( Lok Sabha Election 2024 ) जागावाटपावरून महायुतीत ( Mahayuti ) खदखद सुरू आहे. भाजपनं हिंगोली, नाशिक, संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ आणि परभणीच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता परसली आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांनी तर उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या घराबाहेर ठिय्या मांडला होता. यावरून शिवसेना ( शिंदे गट ) नेते अर्जुन खोतकर ( Arjun Khotkar ) यांनी भाजपला सुनावलं आहे.

"भाजपनं मैत्री जपली पाहिजे. तातडीनं जागावाटपासंदर्भात एक घाव दोन तुकडे केले पाहिजेत," अशी रोखठोक भूमिका खोतकरांनी ( Arjun Khotkar ) व्यक्त केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्जुन खोतकर म्हणाले, "जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर जे सुरू आहे ते चांगलं नाही. आपापल्या जागा सर्वांना वाटून आल्या पाहिजेत. शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे आणि भाजपबरोबर गेले आहेत. त्यामुळे खासदारांच्या जागावाटपात खोडा घालणं कुणालाही पटणार नाही. त्यामुळे भाजपनं तेवढी तरी मैत्री जपली पाहिजे. त्या जागा सोडून भाजपनं वाद घालायला हवा. हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ या आमच्या जागा भाजपनं मागितल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण होऊ लागली आहे. आपल्या हक्क्कांच्या जागा भाजप दबाव टाकून मागत असेल, तर वाईट आहे."

"एकनाथ शिंदे चौकटीत राहून काम करतात"

"भाजपनं आपल्या जागांवर उमेदवार जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनीही आमच्या जागांवर उमेदवार जाहीर करायला पाहिजे होते. पण, चौकटीत राहणार असल्यानं मुख्यमंत्री शिंदेंनी ते केलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ठरवून दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे वागले. पण, हेमंत गोडसे यांना उमेदवारीसाठी चार-चार वेळा प्रदर्शन करावं लागतंय. यामुळे लोकांत दुही निर्माण होते," असं खोतकरांनी सांगितलं.

"आमच्या जागेवर भाजपनं दावा केल्यानं नुकसान"

"सामान्य लोकांना हे पचणार आणि आवडणार का? याचं आत्मपरीक्षण भाजपनं करावं. भाजपनं आम्हाला सन्मानाची आणि बरोबरीची वागणूक दिली पाहिजे. आमच्या जागेवर भाजपनं दावा केल्यानं नुकसान होत आहे. त्यामुळे जागावाटपासंदर्भात एक घाव दोन तुकडे तातडीनं केले पाहिजे," अशी भूमिका खोतकरांनी मांडली.

"जानकरांना परभणीची जागा CM यांनी दिली, तर स्वागत करू"

"परभणीची जागा 100 टक्के शिवसेनेची आहे. तिथे एकदाही शिवसेनेचा पराभव झाला नाही. पण, ही जागा महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असेल, तर आम्ही स्वागत करू. पण, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. कारण याचे परिणाम दिसायला वेळ लागणार नाही," असा इशारा खोतकरांनी दिला आहे.

"दानवेंच्या विजयासाठी काम करू, पण..."

"जालन्यातून मागील वेळेस मी उभा राहणार होतो. पण, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी समजूत काढली. मी आणि कुटुंबाने रावसाहेब दानवेंचा प्रचार करत विजयी केलं. आताही दानवेंच्या विजयासाठी काम करू. पण, माणसाला आयुष्यात चार शब्द प्रेमाचे लागतात. तोंडावर एक आणि मागे एक बोलायचं, हे माणसाच्या मनाला लागतं. ते काहीही बोलले, तरी महायुतीचा धर्म आम्ही पाळू," असं म्हणत दानवेंबाबत खोतकरांनी खंत व्यक्त केली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT