लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) 45 हून अधिक जागा जिंकणार, असा दावा भाजपकडून करण्यात येतो. मात्र, महायुतीमध्ये आधीच 20 पक्ष असताना आणखी पक्ष जोडण्याचे काम सुरूच आहे. त्याचा फटका सहकारी पक्ष शिवसेना शिंदे गट ( Shivsena Shinde Group ) आणि राष्ट्रवादी अजित पवार ( Ncp Ajit Pawar Group ) गटाला बसणार आहे.
महायुतीमध्ये भाजपने नुकताच मनसेचा समावेश केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी थेट गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांच्याशी चर्चा करून महायुतीत प्रवेश केला. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी कोणत्या अटींवर प्रवेश केला, हे राज्यातील कोणत्या नेत्याला पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या समवेत बैठक झाली. यामध्ये जागा वाटपाचे सूत्र काय हे मात्र गुलदस्त्यातच आहे. ही स्थिती भाजपचे प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गट व पवार गटाच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना अस्वस्थ करू लागल्याचे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रातील उमेदवार टप्प्याटप्प्याने घोषित होत आहेत. याचा अर्थ ज्या टप्प्यात निवडणूक आहेत, त्या प्राधान्यक्रमानुसारच जागा वाटप होईल. उमेदवार देखील त्याप्रमाणे निश्चित होतील. याला जेवढा विलंब होईल, तेवढी इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची कोंडी होणार आहे. मनसेचा महायुतीत समावेश झाल्यानंतर त्यांनी मागितलेल्या जागा कोणत्या हे अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. मात्र, या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यामुळे त्याचा फटका देखील शिंदे गटालाच बसणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाच्या विद्यमान 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल हा राजकीय व्यवहार आहे. मात्र, आता यातील काही खासदारांना अपात्र ठरविण्याचे मनसुबे भाजपने रचले आहेत. त्यासाठी सर्वेचा आधार घेतला जात आहे. भाजपचे इच्छुक उमेदवार यादीत शिंदे गटाच्या उमेदवारांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यांचा थेट रोख हे उमेदवार विजयी होणार नाहीत, असा असतो. त्यामुळे शिंदे गटात मोठी नाराजी पसरू शकते.
शिंदे गटाच्या काही खासदारांना थांबण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जाते. यातून या खासदारांवर अन्याय होणार आहे. असाच अन्याय आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीत आमदारांवर देखील होऊ शकतो, असा संदेश यातून गेला आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी, खासदार, आमदारांशी चर्चा करताना या विषयावर अतिशय भावुक झाले आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा इशारा देखील दिला आहे. येत्या काही दिवसांत या हालचाली अधिक गतिमान होतील. असे घडल्यास त्याची सर्वात मोठी झळ शिवसेना शिंदे गटाला बसेल. शिवसेनेच्या शिंदे गटातून बाहेर पडलेले हे कार्यकर्ते निश्चितच भाजपकडे जाणार नाहीत. कारण, त्यांची गैरसोय भाजपमुळेच झाली हे उघड आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटप जेवढे लांबत जाईल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता त्याच्या दुप्पट गतीने वाढत जाणार आहे. हे चित्र महायुती आणि शिंदे गटासाठी नक्कीच लाभदायी नाही.
महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा घोळ रोज नवे वळण घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दिल्लीला जाऊन आले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत यावर ठोस तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. रेंगाळलेली उमेदवारांची घोषणा या कालावधीत होईल, अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास यातून महायुतीच्या विसंवादातील चित्र उघड होईल. भाजपला महायुतीमध्ये जमतील तेवढे पक्ष समाविष्ट करायचे आहेत. पण, नवीन पक्ष समाविष्ट केला तरी त्यांना द्यावयाच्या जागा मात्र भाजप स्वतःच्या देणार नाही. परिणामी त्याची झळ सगळ्यात मोठा वाटेकरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बसेल. शिंदे गटाच्या जेवढ्या जागा कमी होतील, तेवढी या पक्षातील, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी वाढणार आहे. त्यामुळे युतीचे रेंगाळलेले जागावाटप हे लोकसभेनंतर शिंदे गटाच्या विभाजनाचे कारण तर ठरणार नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.