Lok Sabha Election 2024 Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : राज्यातील प्रमुख पक्षांकडून 17 महिला निवडणूक रिंगणात; यंदा सर्वाधिक महिला विजयी होणार?

Chetan Zadpe

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Constituency) प्रमुख पक्षांकडून 17 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक संसदेत मंजूर झाले आहे. त्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांकडून आतापासूनच महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 8 महिला खासदार विजयी झाल्या होत्या. यंदाच्या लोकसभेत राज्यातून विक्रमी संख्येने महिला उमेदवार विजयी होऊ शकतात. (Latest Marathi News)

2019 च्या लोकसभा देशभरातून 78 महिला निवडून आल्या होत्या. तर यंदाच्या निवडणुकीतही देशभरातून मोठ्या प्रमाणात महिलांना संधी मिळू शकते. राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने सहा तर काँग्रेसने चार, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रत्येकी दोन महिलांना संधी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक जागेवर महिला उमेदवाराला संधी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही पाच महिलांना उमेदवारीची संधी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदाच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे. या नणंद-भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

दुसरीकडे भाजपने सहा महिलांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांना भाजपने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. बीडमधून माजी मंत्री पंकजा मुंडे, नंदूरबार मतदारसंघातून डॉ. हिना गावित या तिसऱ्यांदा भाजपकडून नशीब आजमावत आहेत.

जळगाव मतदार संघातून स्मिता वाघ या भाजपकडून लढत आहेत, तर रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे, अमरावती मतदारसंघातून भाजपच्या वतीने खासदार नवनीत राणा या उमेदवार आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर तर पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाने यवतमाळ-वाशीम मतदारसंघात राजश्री पाटील, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव यांना संधी दिली आहे.

काँग्रेसने (Congress) धुळे मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, तर मुंबईतून माजी मंत्री वर्षा गायकवाड, सोलापूर मतदार संघातून प्रणिती शिंदे, तर चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर अशा चार महिलांना उमेदवारांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या धाराशिवमधून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit Bahujan Aghadi) पाच महिला उमेदवारांना संधी दिली आहे. रायगडमधून कुमुदिनी चव्हाण, पालघरमधून विजया म्हात्रे, दिंडोरीमधून मालती थवील, शिर्डीमधून उत्कर्षा रुपवते तर मावळमधून माधवी जोशी यांना वंचितकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT