Congress Politics : काँग्रेसने अखेर नागपूर जिल्ह्यातील दोन बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात रामटेक मतदारसंघातून बंडखोरी करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि काटोल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या विरोधात दंड थोपटलेले याज्ञवल्क्य जिचकार यांचा समावेश आहे.
मुळक यांनी रामटेकमधून उमेदवारी मागितली होती. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे मुळकांनी बंडाचे निशान फडकावले आहे.
मुळक माघार घेतील, अशी सर्वांची आशा होती. काँग्रेसने बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले होते. सोबतच सर्व बंडखोरांसोबत संवाद साधण्यासाठी नेत्यांची नियुक्ती केली होती. उमेदवारी मागे घ्यायच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुळक यांच्याशी कोणीही संपर्क साधला नाही. विशेष म्हणजे मुळक यांचा उमेदवारी अर्ज भरताना रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह काँग्रेसचे बरेच पदाधिकारी सोबत होते.
मुळक यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसोबत शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या होत्या. मात्र त्याला यश आले नाही. मुळक यांना बॅट निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याने प्रचार करताना आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे.
याज्ञवल्क्य जिचकार यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितले होते. त्यापूर्वीच त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. हा मतदारसंघत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिनिधित्व करीत होते. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी सोडणार नव्हतीच. यावेळी अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख निवडणूक लढत आहे.
याज्ञवल्क्य जिचकार हे माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र आहेत. त्याना शिलाई मशीन हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. श्रीकांत जिचकार 35 वर्षांपूर्वी काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ते अर्थमंत्री होते.
नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. 25 वर्षांपासून एकच नेता या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहे. ते सातत्याने मंत्रिमंडळात होते. असे असतानाही नरखेड-काटोलचा विकास झाला नाही, त्यामुळे आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे याज्ञवल्क्य जिचकार यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.