Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध निवडून आणत महायुतीने दमदार कामगिरी केली आहे. महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा बिनविरोध करीत जोरदार आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच बॅकफूटवर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीने दाखवलेल्या एकजुटीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने रणांगणातून माघार घेतली. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विशेष प्लँनिंग करीत यवतमाळ व ठाणे पालघर विधानपरिषद मतदारसंघ बिनविरोध केले तर परभणी-हिंगोलीत मात्र त्यांचे बिनविरोधचे 'प्लॅनिंग' फसले.
विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) काही मतदारसंघात जोरदार तयारी सुरु केली होती. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांची स्टॅटर्जी होती. यवतमाळ मतदारसंघात एकनाथ शिंदेंचे लाडके असलेले किरण पांडव यांचे नाव इच्छुकांत आघाडीवर होते. मात्र, दुसरीकडे याठिकाणी मंत्री संजय राठोड त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, राठोड यांनी ऐनवेळी त्यांचे मत पांडव ऐवजी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या पारड्यात टाकले. नागपूरचे दुष्यंत चतुर्वेदी यवतमाळ विधान परिषदेचे आमदार होते. कार्यकाळ संपल्यानंतर ते पक्षात फारसे सक्रिय दिसले नाहीत, पण नशिबाने त्यांना साथ दिली. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री संजय राठोड यांच्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली.
यवतमाळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेसचे (Congress) साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली. आघाडीकडे जिंकण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने माघार घेत असल्याचे सांगितले. या संधीचा फायदा घेत उर्वरित तीन अपक्ष उमेदवारांना शिंदे सेनेने गळाला लावले. त्यामुळे महाविकास आघाडी बिनविरोध निवडणूक होऊ नये म्हणून अपक्षाला आघाडी पुरस्कृत करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या मतदारसंघातील तीन अपक्षांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे याठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली.
यवतमाळमध्ये शिंदे शिवसेनेने जे केले ते परभणी-हिंगोलीत मात्र जमले नाही. मराठवाड्यातील परभणी मतदारसंघात शिवसेनेने 'खान पाहिजे की बाण?"... ही टॅगलाइन घेऊन गेली अनेक वर्षे याठिकाणी मते मागितली. मात्र, त्याच ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेने परभणी हिंगोलीत बाणाच्या पक्षाने खान मैदानात उतरवला. याठिकाणी शिंदे शिवसेनेने सईद खान यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यांना याठिकाणी खानासाठी बाणावर मते मागावी लागत आहेत.
परभणीत लोकसभेला मुस्लीम समाजाने उद्धव ठाकरेंना साथ दिली. त्यानंतर परभणी महापालिकेच्या निवडणुकीत महापौरपदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुस्लिम चेहऱ्याला संधी दिली. त्यावेळी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिंदुत्ववरून टीका केली होती. त्यातच आता तीन महिन्यातच मुस्लिमांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी शिंदेंनी सईद खान यांना संधी दिली असली तरी ती महायुतीमधील भाजपला रुचणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी याठिकाणी शिवसेनेचे संकटमोचक मंत्री उदय सामंत ठाण मांडून बसले होते. यावेळी महायुतीमधील बंडखोरांनी माघार घेतली मात्र ठाकरे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. विवेक नावंदर व काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आघाडीविरोधात बंड पुकारत उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे त्याठिकाणची निवडणूक बिनविरोध करण्याच्या शिंदे शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.