

Mahayuti vs MVA Nashik political battle: राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी निवडणुकीसाठी १७ जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. महायुती- महाविकास आघाडीनेही आपले उमेदवार जाहीर केले. येत्या 18 जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
दरम्यान आज सोमवार (दि.१) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ४ जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. दरम्यान नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
नाशिकमध्ये महायुतीची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली होती.
ठाकरे गटाकडून निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता या निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण शेवटच्या दिवसापर्यंत अनिल कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. महाविकास आघाडीकडून कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
मतदारांचे संख्याबळ जुळत नसल्याने ठाकरेंची शिवसेना हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद मिर्लेकर पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. परंतु यावेळी आमदार सुहास कांदे गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या पत्नी अंजुम कांदे या विधानपरिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. पंरतु, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने आमदार सुहास कांदे नाराज असल्याची चर्चा आहे.
मतदारांच्या संख्येचा विचार करता याठिकाणी महायुतीचे पारडे जड असल्याचे बघायला मिळत आहे. जवळपास एकुण ६२३ मतदार आहे. त्यात भाजपकडे १९०, शिवसेनेकडे १७० तर राष्ट्रवादीकडे १०७ मतदार आहेत. महाविकास आघाडीकडे जेमतेम शंभरच्या घरात मतदारसंख्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत उमेदवारच उतरवला नाही असे दिसते.
दरम्यान दुसरीकडे ही जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सुटली आहे. परंतु भाजपनेही ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. भाजपचे गणेश गीते यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधील एक गट नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे गणेश गीते यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास दराडेंपुढच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे विधान परिषदेच्या रणधुमाळीत नेमकं काय घडतं हे पाहण्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गणेश गिते यांच्या भूमिकेवर महायुतीची पुढील दिशा ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.