Mumbai News : राज्यातील 17 विधानपरिषदेच्या जागांसाठी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी शेवटचा एक दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघडीच्या गोटात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. दुसरीकडे मात्र विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी 'बॅकफूट'वर दिसत आहे. तीन मतदारसंघांत उमेदवारच नसल्याने मतदानापूर्वीच महायुतीचा या तीन जागांवरील गुलाल कन्फर्म समजला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली असल्याने महाविकास आघाडीकडे विधानपरिषद निवडणूक लढण्याएवढे पुरेसे संख्याबळ नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकीकडे राज्यातील काही मतदारसंघात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. ही बंडखोरी मागे घेण्याचे आव्हान महायुतीकडून करण्यात आले आहेत तर दुसरीकडे त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
दुसरीकडे मात्र, महाविकास आघाडीत मतदानाआधीच मोठी बंडाळी झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः आघाडीच्या जागावाटपात नाशिकचा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला आला होता. याठिकाणी माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म देखील दिला होता. मात्र, त्यांनी त्याठिकाणी उमेदवारी अर्ज वेळेत भरला नाही. त्यामुळे याठिकाणी महायुतीसाठी संपूर्ण मैदान मोकळे दिसत आहे. याठिकाणी आघाडीला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन आखाडयात उतरविण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही लढत एकतर्फी ठरणार आहे.
यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातूनही मविआची काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या साहेबराव कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून सपशेल माघार घेतली आहे. कांबळे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत होते. मात्र, काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळालेल्या साहेबराव कांबळेंनी महाविकास आघाडीकडे निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही, असे म्हणत निवडणुकीतून माघार घेतली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके या उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा होती. स्वतः राणी लंके यांनीही सोशल मीडियावरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्या अर्ज दाखल करण्यासाठी अहिल्यानगर शहरातही दाखल झाल्या होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांनी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांपैकी एकही कार्यकर्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे लंके गटाने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याची चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दीप चव्हाण यांचेही नाव चर्चेत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दीप चव्हाण आणि करण ससाणे हे दोघेही संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, दीप चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे सध्या तरी करण ससाणे हेच मविआकडून संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. त्यांनी अर्ज अपक्ष म्हणून भरला असला, तरी अंतिम क्षणी महाविकास आघाडी त्यांना अधिकृत पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विधानपरिषदेच्या 17 पैकी नाशिक, यवतमाळ, अहिल्यानगर या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने त्याठिकाणची निवडणूक महायुतीसाठी सोपी झाली आहे. याठिकाणी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे. मात्र याठिकाणी उमेदवारच नसल्याने महाविकास आघाडी बॅकफूटवर दिसत आहे. नाशिक, अहिल्यानगर व यवतमाळ या तीन मतदारसंघांत उमेदवारच नसल्याने महायुतीसाठी मैदान मोकळे झाले आहे. याठिकाणी एकतर्फी लढत होणार असल्याने महायुतीचा उमेदवार या दोन्ही ठिकाणी विजयी होणार असल्याने महायुतीमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.