

Ahilyanagar Local Authorities Constituency : अहिल्यानगर जिल्ह्यातील सलग दोन निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला अधिकृत आणि तुल्यबळ उमेदवार वेळेत उभा करता आलेला नाही. त्यामुळे हा केवळ संवादाचा अभाव आहे की त्यामागे काही वेगळे राजकीय गणित आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राहुरीच्या पोटनिवडणुकीत सुरुवातीला महाविकास आघाडीची सर्व भिस्त माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्यावर होती. मात्र त्यांच्या माघारीच्या चर्चांनंतर अखेर अपक्ष उमेदवार गोविंद मोकाटे यांना अधिकृत पाठिंबा देण्याची वेळ आली. आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतही जवळपास तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात अहिल्यानगरची जागा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला गेल्याचे 28 मे रोजी स्पष्ट करण्यात आले होते. काँग्रेसकडून दीप चव्हाण यांच्या नावाने एबी फॉर्मही तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र, शेवटच्या क्षणी श्रीरामपूर काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा पुढे आली. यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला.
यापुढील घडामोडी अधिकच गूढ ठरल्या. काँग्रेस नेतृत्वाने करण ससाणे यांना अधिकृत उमेदवार म्हणून दुसरा अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या नावाचा एबी फॉर्म देण्याचीही तयारी होती. मात्र ससाणे यांनी त्याबाबत उत्सुकता दाखवली नाही. दुसरीकडे दीप चव्हाण यांना निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचे सांगण्यात आले, परंतु शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा स्पष्ट आदेश मिळालाच नाही, अशी माहिती सूत्रांकडून पुढे आली.
यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली असताना राणी लंके यांचे नाव अचानक पुढे का आले? करण ससाणे यांनी पक्षाचा अधिकृत अर्ज का भरला नाही? एबी फॉर्म तयार असतानाही दीप चव्हाण यांना हिरवा कंदील का मिळाला नाही? आणि आता रिंगणात काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच नसताना शरद पवार राष्ट्रवादी नेमके कोणाला आणि कशा प्रकारे पाठिंबा देणार आहे? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घडामोडींचे आपापल्या पद्धतीने समर्थन केले असले, तरी सलग दुसऱ्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित करण्यामध्ये झालेला विलंब आणि निर्माण झालेला संभ्रम हा आघाडीतील विसंवाद अधोरेखित करणारा ठरत आहे.
दुसरीकडे महायुतीतही काही राजकीय हालचालींनी उत्सुकता वाढवली आहे. राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खंदे समर्थक दत्तात्रय पानसरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण आले आहे. दत्तात्रय पानसरे यांचा अर्ज नेमका कोणाच्या आशीर्वादाने भरला गेला? ते अखेर बंडखोरी करतील की दबावतंत्र वापरून राजकीय सौदा साधतील? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे प्राजक्त तनपुरे, काँग्रेसचे करण ससाणे (अपक्ष), दत्तात्रय पानसरे, मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी असे पाच उमेदवार आहेत. 4 जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नेमके कोण अंतिम रिंगणात राहणार, हे स्पष्ट होणार आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत महायुतीची बाजू भक्कम मानली जात आहे. एकूण 461 मतदारांपैकी भाजपचे 207, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 60, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 47 आणि राहुरीतील तनपुरे समर्थक 20 असे मिळून महायुतीकडे सुमारे 334 मतांचे बळ आहे. तर महाविकास आघाडीकडे अवघी 127 मते असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे 30, काँग्रेसचे 31, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6, आमदार सत्यजित तांबे यांच्या पक्षाचे 31, शंकरराव गडाख गटाचे 11, अपक्ष 8, वंचित बहुजन आघाडीचे 3, बहुजन समाज पक्षाचा 1, एमआयएमचे 2 आणि इतर 4 मतदारांचा समावेश आहे.
विजयासाठी आवश्यक असलेला 231 मतांचा टप्पा महायुती सहज पार करत असल्याचे चित्र असल्याने सध्यातरी प्राजक्त तनपुरे यांचा विजयाचा मार्ग सुकर मानला जात आहे. मात्र अर्ज माघारीनंतरचे राजकीय समीकरण, अपक्षांची भूमिका आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग या घटकांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय उत्सुकता कायम राहणार आहे.
एकंदरीत, या निवडणुकीत महायुतीचे गणित मजबूत दिसत असताना महाविकास आघाडीतील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये उमेदवार निवडीवरून निर्माण झालेला गोंधळ भविष्यातही कायम राहिला, तर जिल्ह्यात आधीच कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीसमोर राजकीय अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.