MLC election exit poll Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MLC election News : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुती, महाविकास आघाडीत 'टफ फाईट'! बंडखोर कोणाचा 'गेम' बिघडवणार; 'एक्झिट पोल'चा धक्कादायक अंदाज समोर

MLC election exit poll News : महायुती व महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने एक्झिट पोलमधून धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली आहे.

Sachin Waghmare

Pune News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागासाठी शुक्रवारी सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. राज्यातील पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर पदवीधर व पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच ठिकाणी उत्साही वातावरणात मतदान पार पडले. मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील पाचही मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीत काट्याची टक्कर पाहवयास मिळाली.

महायुती व महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने एक्झिट पोलमधून धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली आहे. त्यामध्ये पुणे पदवीधर व नागपूर पदवीधरमध्ये भाजप, छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचे पारडे जड राहील, असा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा राहणार असल्याने पाच जागांपैकी महायुती चार तर महाविकास आघाडी एक असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे पदवीधरमध्ये भाजपचे कमळ फुलणार ?

साम टीव्हीच्या एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा जाधव-देशमुख यांच्यात सरळ लढत झाली. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) बंडखोरी केली होती. ठाकरे सेनेकडून सुनील मोदी यांनी निवडणूक लढवली. या चुरशीच्या लढतीत या मतदारसंघात भाजप उमेदवार स्मिता जाधव यांचे पारडे जड राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी चौथ्यांदा बाजी मारण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)आमदार सतीश चव्हाण महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवला होता. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे हे देखील निवडणूक मैदानात उतरले होते. काँग्रेसने प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काळे यांना सुनावले होते. त्यामुळे याठिकाणी चुरस पाहवयास मिळाली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण चौथ्यांदा पुन्हा बाजी मारतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेससाठी गुडन्यूज?

अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेससाठी गुडन्यूज असणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तर महायुतीकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्याविरोधात निकाल जाण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार याठिकाणी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकते. याठिकाणी भाजपच्या तीन जणांनी तर शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी बंडखोरी केली होती. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरले होते. महायुतीमधील बंडखोरीचा फटका सेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपूर पदवीधरमध्ये भाजप कमबॅक करणार ?

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचे नाव नागपूर पदवीधरमधून संभाव्य आमदार म्हणून 'साम'च्या एक्झिट पोलच्या आकडेवारीत पुढे आले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजात नागपूर पदवीधरमध्ये भाजप कमबॅक करण्याची शक्यता असून काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारींची धडधड वाढवणारा अंदाज समोर येत आहे. हा अंदाज खरा ठरला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असणार आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात धक्कादायक निकाल

पुणे शिक्षक मतदारसंघात धक्कादायक निकालाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मतदारसंघात सुरुवातीपासून चुरस दिसत होती. या मतदारसंघावरून जागावाटपात भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसत होती. मात्र एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्यासाठी हा मतदारसंघ भाजपने सोडला नाही. भाजपने याठिकाणी कौस्तुभ गावडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर निवडणूक लढवली. तर माजी आमदार दत्तात्रय सावंत हेही शिक्षक संघटनांच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले होते. याशिवाय शिवसेनेकडून इच्छुक असलेले मंत्री उदय सामंत यांचे माजी ओएसडी सचिन सानप यांनी ऐनवेळी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला. शिवसेनेने महायुतीच्या उमेदवाराऐवजी सचिन सानप यांना पाठींबा दिला होता. याठिकाणी सचिन सानप यांचे पारडे जड राहिल असे भाकीत एक्झिट पोलने वर्तवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT