Devendra Fadnavis And Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Shiv Sena alliance : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजप, शिवसेनेतील मतभेदाबाबत मोठे विधान; म्हणाले,'महायुती कधीच......'

Mahayuti News : कुटुंब म्हटले की छोट्या-मोठ्या कुरबुरी आणि भांडणे होत असतात. मात्र त्याचा अर्थ संसार मोडणार असा होत नाही.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीमधील भाजप व शिवसेनेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण तापले आहे. नागपूर व पुण्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडील नेत्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. त्यावर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री असलेल्या योगेश कदम यांनी मोठे विधान केले आहे. भाजप, शिवसेनेत काही मुद्द्यावरून मतभेद आहेत. मात्र, महायुती कधीच तुटणार नाही ती अभेद्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे गृह आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे वसई येथे कार्यकर्ता संवाद दौऱ्यानिमित्त उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप (BJP) यांच्यातील काही विषयांवर मतभेद असल्याचे पुढे आले असले तरी तर ते चर्चेतून सोडवले पाहिजेत, असे मत गृह व अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले. संबंधितांशी संवाद साधून बैठकीत हे विषय मांडले पाहिजेत. त्यावर स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. महायुती कायम अभेद्य आहे. ही युती कधीही तुटू शकत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना (Shivsena) आणि भाजप यांच्यामध्ये कौटुंबिक नात्यातही कधीच दुरावा निर्माण होणार नाही. कुटुंब म्हटले की छोट्या-मोठ्या कुरबुरी आणि भांडणे होत असतात. मात्र त्याचा अर्थ संसार मोडणार असा होत नाही. त्याचप्रमाणे युतीमध्येही काही मतभेद असू शकतात, पण त्यामुळे युती तुटणार नाही, असे स्पष्ट मत योगेश कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी एसआयआर प्रक्रियेवरून विरोधकांवर निशाणा साधला. एसआयआर प्रक्रियेमुळे घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर देशातील नागरिक जागरूक आहेत. अशा परिस्थितीत याचे खापर आमच्यावर फोडणे चुकीचे आहे, असे कदम म्हणाले. एसआयआरची प्रक्रिया यापूर्वीही राबवण्यात आली होती. मात्र, आता या प्रक्रियेवरून राजकीय आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात गृह विभागाच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेकांना शोधून त्यांची हद्दपारी करण्यात आली आहे, असा दावाही योगेश कदम यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT